नागरीकत्व संशोधन कायदा समर्थनार्थ मोर्चा

0

भारत माता की जय व वंदे मातरमच्या घोषणांनी भुसावळ शहर दणाणले ः प्रांताधिकारी प्रशासनाला मोर्चेकर्‍यांचे निवेदन

भुसावळ- नागरीकत्व संशोधन कायद्याच्या समर्थनार्थ भुसावळात राष्ट्रीय सुरक्षा मंचतर्फे मंगळवारी सकाळी 10 वाजता अष्टभुजा मंदिर ते प्रांताधिकारी कार्यालयादरम्यान पायी मोर्चा काढण्यात आला. मोर्चात खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारेंसह नगराध्यक्ष रमण भोळेंसह हजारो नागरीकांनी सहभाग दर्शवला. अष्टभूजा मंदिराजवळ शहरातील ज्येष्ठ नागरीकांच्याहस्ते भारत मातेचे पूजन करून मोर्चास सुरुवात झाली. या मोर्चात शहरातील व्यापारी , विद्यार्थी संघटना, विविध सामाजिक संघटना, महिला मंडळे आणि राजकी तसेच विविध पक्षांचे कार्यकर्ते सहभागी झाले. मोर्चादरम्यान भारत माता की जय व वंदे मातरम या घोषणा देण्यात आल्या.

कायद्याच्या गैरसमजाची दिली माहिती
प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर मोर्चा आल्यानंतर मोर्चाचे रुपांतर जाहिर सभेत झाले. यावेळी विचार मंचावर प्रवीण नायसे, अ‍ॅड.योगेश बाविस्कर, शहर संघ चालक डॉ.विरेंद्र झांबरे, डॉ.संजय गादिया, दिनेश दोधानी, भारती वैष्णव, सिध्देश्‍वर लटपटे, निर्मल मथरु सरदार, रीतेश जैन उपस्थित होते. या प्रसंगी प्रवीण नायसे यांनी हा कायदा व त्याबद्दल पसरविले जाणारे गैरसमज याबद्दल माहिती दिली. अ‍ॅड.योगेश बाविस्कर यांनी हा कायदा 1955 असून यात पाच वेळा दुरुस्ती झाली आहे. हा कायदा 2019 मध्ये दुरुस्त करण्याची गरज का भासली ? याबाबत त्यांनी माहिती दिली. डॉ. विरेंद्र झांबरे यांनी मार्गदर्शन करतांना महापुरुषांना आपण जाती-पातींमध्ये वाटून घेतले असल्याचे सांगत त्यांच्या विचारांवर आपण चालत नाही, अफवांवर विश्‍वास ठेवू नका, राष्ट्रप्रथम नंतर स्व:हिताचा विचार असेही ते म्हणाले. दिनेश दोधानी यांनी शेजारी देशांमधील अल्पसंख्य समाजाची वेदना व या कायद्यामुळे होणारा लाभ यावर भाष्य केले. भारती वैष्णव यांनी सीएए या कायद्याबद्दल लोकांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न काही शक्ती करत असल्याचे सांगितले. सिध्देश्‍वर लटपटे यांनी शेजारील धार्मिक राष्ट्रांमधील अल्पसंख्य समाजाला भारताने स्विकारले नाही तर जगातील कोणता देश स्विकारेल ? असा सवाल उपस्थित केला. संसदेने पारीत केलेल्या कायद्याच्या विरुध्द आंदोलन करण्याचा अधिकार घटनेने दिला असून या कायद्याचा विरोध करतांना जी आंदोलन केली गेली त्यात आम्ही गांधी विचाराने चालतो, अशा घोषणा दिल्या गेल्या मग आंदोलनातुन जाळपोळ हा कोणता गांधी विचार आहे? असा प्रश्‍न उपस्थित करीत ज्या विद्यापीठांमधून या कायद्याचा विद्यार्थ्यांनी विरोध केला, आंदोलने केली तेथे चार हजार विद्यार्थी होते मग आंदोलनामध्ये 16 हजारांपर्यंत कसे झाले ? असा प्रश्‍न केला. नागरीकत्व संशोधन कायद्याचा विरोध करतांना झालेल्या आंदोलनांमध्ये पोलिसांवर झालेल्या हल्ल्यांचा निषेध त्यांनी केला. या सभेचे सूत्रसंचालन सोनू मांडे व शिशिर जावळे यांनी केले.

प्रांताधिकारी प्रशासनाला निवेदन
राष्ट्रगीतानंतर सभेचा समारोप होवून नागरी सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ शिष्टमंडळाने प्रांताधिकारी प्रशासनाला निवेदन देण्यात आले. या निवेदनामध्ये पाकिस्थान, अफगानिस्थान व बांग्लादेश येथील धार्मिक अत्याचार पिडीत निर्वासित हिंदू, बौध्द, जैन, शीख, पारसी व ईसाई बांधवांना नागरीकत्व देण्यासंदर्भात संसदेच्या दोन्ही सभागृहात नागरीकता संशोधन विधेयक पारित झाले आहे. त्यावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी होवून विधेयकाचे कायद्यात रुपांतर झाले आहे. या कायद्याचे भुसावळ तालुक्यातील जनतेने स्वागत केले असून समर्थन करीत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. स्वतःला थोर विचारवंत समजणारे या कायद्याच्या विरोधात जाऊन देशात अराजकता माजविण्याचे काम काही संघटनाही करत आहेत. अर्धवट व चुकिची माहिती पसरवून मोठ्या प्रमाणात हिंसाचार करविण्यात येत आहे. हिंसाचार पसरविणार्‍या व्यक्ती व संघटनांवर योग्य ती चौकशी करून गुन्हे नोंद करावेत, अशी मागणीही करण्यात आली आहे.

विविध संघटनांनी दिला पाठिंबा
मोर्चास भुसावळ येथील रोटरी क्लब ऑफ रेलसीटी, श्री अष्टभुजा ज्येष्ठ नागरीक संघ, हिंदू सभा न्यास, भगवान महावीर नवयुवक फाउंडेशन, श्री वर्धमान समाज, गुरुव्दारा गुरुसिंग सभा, माहेश्‍वरी समाज मंडळ, राधाकृष्ण प्रभात फेरी, ब्राम्हण समाजसेवा मंडळ, व्यंकटेश मंदिर ट्रस्ट, हनुमान मंदिर ट्रस्ट, जय मातृभूमी मंडळ, भा.ज.पा. भुसावळ यांनी पाठिंबा देवून कायद्याच्या समर्थनार्थ प्रांताधिकारी कार्यालयात निवेदन सादर केले. मराठा समाज मंडळ या कायद्याच्या समर्थनार्थ बुधवार निवेदन देणार आहे.