नाटीकांमधून विद्यार्थ्यांनी वेधले ज्वलंत प्रश्‍नांकडे लक्ष

0

भुसावळातील श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकीत स्नेहसंमेलन उत्साहात ; आज मान्यवरांच्या हस्ते पारीतोषिक वितरण

भुसावळ- कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेला शेती व्यवसाय, क्रांती कारकांचे समाजासाठी असलेले बलिदान, फिल्म इंडस्ट्रीतले स्ट्रगल यासह गल्ली ते दिल्लीपर्यंत असणार्‍या विविध ज्वलंत प्रश्‍नांना लिलया हाताळून विद्यार्थ्यांनी आपल्या अभिनयाने उपस्थितांना अंतर्मुख केले. शहरातील श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात अंतरंग स्नेहसंमेलन सुरू असून शुक्रवारी त्याचा बक्षीस वितरणाने समारोप होत आहे.

मार्मिक विषयांवर विद्यार्थ्यांचे भाष्य
शेतीच्या चक्रव्युहात अडकलेला शेतकरी व सर्व परीस्थिती जुळून आली तरी उत्पादनाचा दर कमी मिळाल्याने त्याची झालेली बिकट अवस्था हे शेतकर्‍यांचे हे चित्र नाटकाच्या माध्यमातून विवेक तायडे आणि सहकार्‍यांनी मांडले. बी-बियाणे, खते, औषधी, मशागत, मजुरी, वाहतूक, कर्जावरील व्याज आदीतून काही राहिले, तर त्याला संसार आहेच ना? कुटुंबीयाचे दुखणे-खुपणे, लग्नसोहळे हे त्यालाही लागू आहेत. जेव्हा शेतीतील उत्पन्न शेतीतील गरज भागवू शकत नाही, तिथे त्याच्या कौटुंबिक खर्चाचे काय? मग शेवटचा पर्याय त्याच्यासमोर येतो तो म्हणजे आत्महत्या. पण शेतकर्‍यांच तेच नेमकं चुकत हे दाखवण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी केला. एमआयजी ग्रूपने माईमच्या माध्यमातून ‘गांधी नावाची हाडामांसांची व्यक्ती अस्तित्वात होती, असा आदर्श पुरुष पुन्हा होणे नाही’ कारण ग्रामस्वराज्य असो की ग्रामोद्योग, व्यक्तिगत आचरण असो की राहणीमान, पर्यावरण, आरोग्य, सर्वधर्म समभाव, एक नव्हे तर अनेक विषयांवर त्यांनी मांडलेली मते दाखवण्याचा प्रयत्न केला.

देशासाठी समर्पित भावना हवी
मानसी पाटील व अजय पाटील यांनी क्रांतीकारक भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांनी तारुण्यात केलेलं बलिदान आज व्यर्थ जाऊ देऊ नका. तरुणांनो आमचं रक्त उसळत की; भाऊबंदकी मध्ये शेताचे बांध कोरतांना, शेजार्‍याची जिरवायला, निवडणुकामध्ये, जत्रात मिरवायला, महागडे मोबाईल वापरायला. उरलंच तर, फ्लर्ट करायला, कुणा मागे मागे शेपुट हलवत फिरायला. यासाठी का क्रांतिकारक हसत हसत फासावर गेले? त्यांच्या कार्यातून पेटून उठा त्यांची समर्पित भावना लक्षात घ्या हा संदेश दिला. झाशीची राणीने इंग्रजांशी दिलेला लढा नृत्याच्या स्वरूपात सादर करण्यात आला.

विविध कार्यक्रमांचे सादरीकरण
गुरुवारी आशिष शर्मा याने ओ रे प्रिया, जयेश नहारने करो नाम रोशन, प्रदीप वसाने आणि सायली महाजन यांनी जब से मेरा दिल, प्रेमकुमार पाटील आणि उज्मा देशमुख यांनी आज काल तेरे मेरे प्यार के, आशीष शर्मा आणि ग्रुपने राशी कमर, निखिल महाजन अँड ग्रुपने संदिशे आते है, प्रदीप वसाने आणि ग्रुपने आया तेरे दार पे, अंकिता वाणी आणि ग्रुपने बुमरो बुमरो, प्राजक्ता पाटील आणि प्रेम पाटीलने जन्म जन्म, पेहली नझार मे प्रद्युम्न कापुरीने पहिली नजर मे, पुष्पकुमार खरेने गाणे वाजू द्या हे गीत सादर केले. आकाश बेंबरे याने सैराट झालं जी हे इन्स्ट्रुमेंटल गाणे बासुरीने सादर केले. राहुल अहुजा, अजय हिरोळे, प्रीती खडसे, पूजा पाटील यांनी नृत्य सादर केले तर मयूर तायडे व प्रज्ञा पाटील, कोळी ग्रुप, रिदमिक स्क्वाड, एलसीए ग्रुप (आयुुई आणि ग्रुप), आर्मी डान्स (समशेर शेख आणि ग्रुप), एसएसएसजीबी स्टुनर्स (मयूर तायडे 7 ग्रुप) यांनी समूह नृत्य सादर केले. रमाकांत भालेराव, दिनकर हेलोडे, वीरेंद्र पाटील यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

आज पारीतोषिक वितरण
वार्षिक पारितोषिक वितरण शुक्रवार, 29 मार्च रोजी होणार आहे. डॉ. बाबासाहेब तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.व्ही.आर.शास्त्री, पी.के.पेंडसे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पारीतोषिक वितरण होणार असल्याची माहिती स्नेह संमेलन प्रमुख प्रा. अविनाश पाटील यांनी दिली.