नाणारचे समर्थन करणाऱ्या जि.प.सदस्याची शिवसेनेतून हकालपट्टी

0

सिंधुदुर्ग: युतीचे सरकार असतांना कोंकणात नाणार रिफायनरी प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली होती. मात्र शिवसेनेने विरोध केल्याने तो निर्णय रद्द करावा लागला. आता पुन्हा नाणारचा विषय चर्चेला येऊ लागला आहे. काही शिवसैनिकांनी नाणारला समर्थन दर्शविले आहे. या प्रकरणाची पक्षाने गंभीर दखल घेतली आहे. जिल्हा परिषद सदस्या मंदा शिवलकर यांनीही नाणारचे समर्थन केले होते, त्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी जाहीर सभेत याची घोषणा केली.

नाणार प्रकल्पाला पाठिंबा देण्यासाठी १७ फेब्रुवारी शिवसेनेचे काही पदाधिकारी आणि शिवसैनिक रस्त्यावर उतरले होते. यात विभागप्रमुख राजा काजवे, जी.प.सदस्या मंदा शिवलकर यांच्यासह शिवसेनेचे इतरही पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. त्यांनतर राजा काजवे यांची हकालपट्टी करण्यात आली होती. तर आता शिवलकर यांना सुद्धा पक्षातून काढण्यात आले आहे.

शिवसेनेकडून रत्नागिरी येथे नाणार प्रकल्पाच्या विरोधकांचा निर्धार मेळावा घेण्यात आला, त्यामध्ये कोणत्याही परिस्थितीत नाणार प्रकल्प होणार नाही अशी भूमिका शिवसेना नेत्यांनी घेतली. उद्या होणाऱ्या नाणार प्रकल्पाच्या समर्थन मेळाव्यात जर कुणी शिवसैनिक आढळून आला तर त्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा सुद्धा यावेळी देण्यात आला आहे.