ना.गिरीश महाजन यांनी जिल्हाध्यक्षांच्या माध्यमातून माझ्याविरोधात षडयंत्र रचले: खासदार ए.टी.पाटील

0

जळगाव-पक्षाचे नेते आणि राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्या माध्यमातून माझ्याविरोधात षडयंत्र रचले असा घणाघाती आरोप खासदार ए.टी.पाटील यांनी केला. आज पारोळ्यात कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. त्यांना लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी नाकारण्यात आल्याने त्यांनी आज आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी कार्यकर्ता मेळावा घेतला. त्यावेळी त्यांनी गिरीश महाजन आणि जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्यावर आरोप केले.

गेल्या दोन वर्षापासून माझ्याविरोधात पक्षांतर्गत षडयंत्र रचले गेले, परंतु मी दुर्लक्ष केले. मात्र माझे दुर्लक्ष आज माझ्या अंगलट आले आहे. स्वपक्षीय लोकांनी घाणेरडे षडयंत्र माझ्याविरोधात रचले. ज्यांनी माझा घात केला त्यांना सोडू नका इसा गर्भित इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.

उमेदवार बदलवा नाही तर अपयश निश्चित
पक्षाने उमेदवार बदलला नाही तर अपयश निश्चित आहे असा इशाराही त्यांनी दिला आहे. अजूनही वेळ गेलेली नाही मोदींना पंतप्रधान करण्यासाठी खासदार निवडणे गरजेचे आहे पण उमेदवार बदलला नाही तर जागा गमवावी लागेल असे त्यांनी सांगितले. दोन दिवसात उमेदवार नाही बदलला तर अपक्ष लढेल असेही त्यांनी सांगितले आहे.