नेत्यांच्या आश्रयाने ठाण मांडलेल्या 350 शिक्षकांवर येणार ’संक्रात’

0

तीन वर्षांपेक्षा अधिक काळ असणार्‍यांची होणार बदली

शिक्षण समितीने घेतला निर्णय

पिंपरी चिंचवड ः चिंचवड महापालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये वर्षांनूवर्षे शिक्षक एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेले आहेत. त्यातील तीन वर्षांपेक्षा अधिककाळ एकाच ठिकाणी ठाण मांडलेल्या शिक्षकांची तात्काळ बदली करावी, तसेच सेवाज्येष्ठतेनूसार पर्यवेक्षकांना पदोन्नती देण्यास शिक्षण समितीच्या सभेत मंजूरी देण्यात आली आहे. राजकीय नेत्यांच्या आश्रयाने बसलेल्या 350 शिक्षकांवर संक्रांत येणार आहे. सरकारी नियमाप्रमाणे तीन किंवा पाच वर्षानंतर महापालिका प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या करणे अपेक्षित आहे. मात्र, कित्येक शाळांमध्ये स्थानिक नगरसेवकांच्या आशीवार्दाने शिक्षकांनी 25 वर्षे सेवा बजावूनही बदली होत नसल्याचे प्रशासनाच्या निर्दशनास आले होते. त्यामुळेच शिक्षण समितीने तीन वर्षापेक्षा अधिककाळ

सोयीनुसार शिक्षकांच्या झाल्या बदल्या…
महापालिकेच्या प्रशासन विभागाने नुकताच ऑनलाईन पध्दतीने एकाच शाळेत गेल्या 15 वर्षे ठाण मांडलेल्या शिक्षकांच्या विरोधात कारवाईचा बडगा उगारला होता. राजकीय दबाव झुगारत त्यांनी 46 शिक्षकांच्या बदल्या केल्या होत्या. त्यावेळी सोयीच्या ठिकाणी बदल्या न मिळाल्याने अनेक शिक्षक बदली रद्द करण्यासाठी नगरसेवकांच्या शिफारशी घेऊन शिक्षण विभागात हेलपाटे मारत होते. महापालिकेच्या प्राथमिक शिक्षक विभागाकडून दरवर्षी समायोजनाने शिक्षक बदल्यांची प्रक्रिया राबविण्यात येते.

ऑनलाईन माहिती भरणे आवश्यक…
राज्य सरकारच्या सूचनांनुसार संपूर्ण बदली प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात आली. बदलीस पात्र व विनंतीसाठी ऑनलाइन माहिती भरणे आवश्यक होते. मात्र, राजकीय हस्तक्षेप वाढल्याने प्रशासन विभागाने थेट ऑनलाइन बदल्या केल्या होत्या. त्या बदलीपत्रावर आयुक्त श्रावण हर्डीकर यांची स्वाक्षरीमुळे अनेक शिक्षकांनी राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता. त्या शिक्षकांच्या शाळांची यादीमध्ये 44 मराठी माध्यमांची, दोन उर्दू माध्यमातील शिक्षक आढळले. त्यापैकी मराठी माध्यमाच्या एका शाळेत 14 ते 25 वर्ष अध्यापन करत असलेल्या 33 उपशिक्षकांचा समावेश आहे. त्यानंतर 10 ते 20 वर्ष एकाच शाळेत ठाण मांडलेल्या 12 पदवीधर शिक्षक, तर उर्दू माध्यमिक शाळांमधील दोन उपशिक्षकांची बदली करण्यात आली आहे. ज्या शाळांमध्ये रिक्त जागा आहेत, तेथे या शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

शासन निर्णयानुसार भरती करण्याचा ठराव…
दरम्यान, महापालिका शिक्षण समितीने एकाच शाळेत तीन वर्षापेक्षा सेवा झालेल्या शिक्षकांच्या बदल्या कराव्यात, पर्यवेक्षकांची पदे भरताना नियमाप्रमाणे सेवा ज्येष्ठतेने भरावीत, तसेच शासनाकडून अतिरिक्त म्हणून पाठविलेल्या शिक्षकांची भरती न करता रितसर जाहिरात देवून शिक्षक भरती करण्यात यावी, याशिवाय उर्दु माध्यमांच्या 43 जागा व हिंदी माध्यमांचा 15 जागा रोस्टर पुर्ण करुन रितसर शासन नियमानुसार भरती करण्यात यावी, असे ठराव करुन त्याला मंजुरी देण्यात आलेली आहे.