नेहरूंच्या जन्मदिनी बालदिन साजरा करू नका; दिल्ली भाजपाध्यक्षांची मोदींकडे मागणी !

0

नवी दिल्ली : भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्त 14 नोव्हेंबरला ‘बालदिन’ साजरा करणे बंद करा, बालदिनाची तारीख 26 डिसेंबर करा, अशी मागणी भाजपचे खासदार दिल्ली भाजपाध्यक्ष मनोज तिवारी यांनी केली आहे.

14 नोव्हेंबर हा जवाहरलाल नेहरु यांचा वाढदिवस देशभरात ‘बालदिन’ म्हणून साजरा केला जातो. त्याऐवजी शिखांचे दहावे गुरु गुरुगोविंद सिंह साहिबादादा फतेहसिंग यांचा शहादत दिवस अर्थात 26 डिसेंबर हा बालदिन म्हणून साजरा करावा, असे मनोज तिवारींनी लिहिले आहे. ‘भारतात बऱ्याच मुलांनी मोठे त्याग केले आहेत. परंतु त्यापैकी साहिबजादे जोरावर सिंह आणि साहिबजादे फतेह सिंह (गुरु गोबिंदसिंह यांचे पुत्र) यांनी केलेले बलिदान सर्वोच्च आहे. 26 डिसेंबर 1705 या दिवशी त्यांनी धर्माच्या रक्षणासाठी पंजाबच्या सरहिंदमध्ये आपले प्राण अर्पण केले’ असे मनोज तिवारी यांनी पत्रात लिहिले आहे.

नेहरुंच्या निधनाआधी संयुक्त राष्ट्रसंघांद्वारे साजरा केला जाणारा आंतरराष्ट्रीय बालदिन 20 नोव्हेंबरला साजरा होत असे. मात्र पंडित नेहरुंनी लहान मुलांच्या शिक्षणासाठी दिलेल्या योगदानामुळे संसदेत ठराव पास करण्यात आला होता. ऐन दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर मनोज तिवारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बालदिनाची तारीख बदलण्यासाठी पत्र लिहिले आहे. दिल्ली मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत तिवारी आघाडीवर मानले जातात.