न्यायप्रविष्ट प्रकरण असतानाही जळगाव पीपल्स बँक निवडणुकीचा निकाल जाहीर

जळगावमधील ठेवीदार चंद्रशेखर अत्तरदे यांचा दावा

जळगाव – दि जळगाव पीपल्स बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी मी जनरल मतदारसंघातून नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. या बँकेत माझ्या मुदत ठेव पावती आहेत. तरी देखील निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी माझा अर्ज बाद केला. याबाबत मी न्यायालयात रिट दाखल केली आहे. त्यावर 19 सुनावणी होणार होती. मात्र, बँकेचे वकील हजर न राहिल्याने ही सुनावणी आता 3 मे रोजी होणार आहे. असे असताना निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी निवडणुकीचा निकाल जाहीर केला आहे. हे बेकायदेशीर असल्याची प्रतिक्रिया चंद्रशेखर अत्तरदे यांनी ’दैनिक जनशक्ती’ शी बोलताना दिली.

दरम्यान, बँकेच्या निवेदनानुसार, दि जळगाव पीपल्स को ऑप बँकेची संचालक मंडळ सदस्यांची 2021-2026 या कालावधीकरिता निवडणूक प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी एन. डी. करे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सांगली यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या सभेस ऑनलाइन पद्धतीने सुमारे 600 पेक्षा जास्त सभासदांची उपस्थिती होती.

या निवडणुकीकरिता एकूण 27 सभासदांनी नामनिर्देशन पत्रे घेतली होती. त्यापैकी 24 सभासदांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. नामनिर्देशन पत्राच्या छाननीमध्ये 9 उमेदवारांचे अर्ज नामंजूर करण्यात आले, तर एका उमेदवाराने नामनिर्देशन पत्र माघारी घेतले. अर्ज माघारीनंतर 14 उमेदवारांचे अर्ज बाकी राहल्याने, हे उमेदवार बँकेच्या संचालक मंडळाचे सदस्य म्हणून बिनविरोध निवडून आले असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सभेमध्ये जाहीर केले.

बँकेचे नवनिर्वाचित संचालक मंडळ

भालचंद्र प्रभाकर पाटील, प्रकाश मांगीलाल कोठारी, चंद्रकांत बळीराम चौधरी, सुनिल प्रभाकर पाटील, रामेश्वर आनंदराम जाखेटे, प्रविण वासुदेव खडके, ज्ञानेश्वर एकनाथ मोराणकर, अनिकेत भालचंद्र पाटील, चंदन सुधाकर अत्तरदे, विलास चुडामण बोरोले, सुहास बाबुराव महाजन, स्मिता प्रकाश पाटील, सुरेखा विलास चौधरी, राजेश धिरजलाल परमार