न्यूझीलंडवर भारताचा दणदणीत विजय; ऐतिहासिक विजयासाठी १-० ची आघाडी

0

ऑकलंड : पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात भारताने न्यूझीलंडवर 6 विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला. या विजयासह भारताने पाच ट्वेन्टी-२० सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. हा विजय भारतासाठी ऐतिहासिक ठरला आहे. क्रिकेट जगतामध्ये ट्वेन्टी-२० मध्ये सर्वाधिक धावांचा पाठलाग करण्याचा मान भारतीय संघाला मिळाला आहे. भारताने आतापर्यंत चार वेळा दोनशेपेक्षा जास्त धावांचा यशस्वी पाठलाग केला आहे. ऑस्ट्रेलियाला ही गोष्ट आतापर्यंत दोनवेळा करता आली आहे. त्याचबरोबर सहा देशांना फक्त एकदा दोनशेपेक्षा जास्त धावांचा यशस्वी पाठलाग करता आला आहे.

पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात न्यूझीलंडच्या फलंदाजांनी तुफानी फटकेबाजी केली. या फटकेबाजीच्या जोरावर न्यूझीलंडला भारतापुढे २०४ धावांचे आव्हान ठेवता आले. पण भारताच्या फलंदाजांनी तुफानी फलंदाजी करत हे आव्हान सहा विकेट्स आणि सहा चेंडू राखून पूर्ण केले.

आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात चांगली झाली नाही. भारताने रोहित शर्माला झटपट गमावले. पण त्यानंतर मात्र लोकेश राहुल आणि विराट कोहली यांनी ९९ धावांची भागीदारी रचली आणि संघाच्या विजयाचा पाया रचला. राहुलने यावेळी ४ चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ५६ धावांची खेळी साकारली. राहुल बाद झाल्यावर कोहली जास्त काळ फलंदाजी करू शकला नाही. कोहलीला यावेळी अर्धशतकासाठी पाच धावा कमी पडल्या. हे दोघे बाद झाल्यावर भारत हा सामना जिंकणार की नाही, असे वाटत होते. पण त्यानंतर श्रेयस अय्यरने तुफानी अर्धशतक झळकावत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.