परवडणार्‍या घरांना केंद्राची मंजुरी

0 1

पीएमआरडीए हद्दीत पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आठ प्रकल्प

पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीत पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आठ प्रकल्पांना केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. केंद्रीय सनियंत्रण व मान्यता समितीच्या बैठकीत या प्रकल्पांमधील तब्बल 32 हजार 627 परवडणार्‍या घरांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे गरिबांचे हक्काच्या घराचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. या योजनेअंतर्गत ’पीएमआरडीए’मार्फत म्हाळुंगे-माण नगररचना योजनेतील (टीपी स्कीम) अत्यल्प उत्पन्न गटासाठी राखीव भूखंडावर चौदा ठिकाणी 13.3 हेक्टर क्षेत्रावर परवडणारी घरे बांधण्यात येणार आहेत.

अत्यअल्प गटासाठी स्वस्त घरे

महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळासोबत (महाहौसिंग) संयुक्त भागीदारी तत्त्वावर ही घरे बांधण्यास ’पीएमआरडीए’ला मान्यता मिळाली आहे. त्या माध्यमातून अत्यल्प उत्पन्न व अल्प उत्पन्न गटांसाठी 6503 स्वस्त घरे उभारली जाणार आहेत. त्यामुळे म्हाळुंगे-माण परिसरातील लोकसंख्या दीड लाखांपर्यंत होणे अपेक्षित आहे. या योजनेमध्ये 38.4 दशलक्ष रहिवासी क्षेत्र, 26.4 दशलक्ष पूर्ण विकास क्षेत्र आणि 16.4 दशलक्ष क्षेत्र व्यावसायिक सोयीसाठी निर्देशित करण्यात आले आहे. यासोबतच आर्थिक दुर्बल घटकातील लाभार्थ्यांना वैयक्तिक स्वरूपात घरकुल बांधण्यास अडीच लाखांपर्यंत अनुदान दिले जाते. त्यानुसार भोर व वेल्हा तालुक्यातील 2436 लाभार्थ्यांना अनुदान दिले जाणार आहे.

अडीच लाखाचे अनुदान

सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर (पीपीपी) खासगी विकासकाकडून परवडणार्‍या घरांची निर्मिती करण्यात सहा विकासक सहभागी होणार असून तब्बल 23 हजार 688 घरांची निर्मिती केली आहे. त्यापैकी 13 हजार 703 घरांची निर्मिती सरकारी दराने केली जाणार आहे, तसेच परवडणार्‍या घरांसाठी अडीच लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे. नागरिकांनी अधिक माहितीसाठी 9561338962/72 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन ’पीएमआरडीए’ने केले आहे.

घराचे स्वप्न पूर्ण होणार

केंद्र सरकारच्या मंजुरीमुळे ’पीएमआरडीए’च्या माध्यमातून अल्प उत्पन्न गटातील नागरिकांच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे; तसेच स्वमालकीच्या जागेवर वैयक्तिक स्वरूपातील घरकुल बांधण्यास 2436 वैयक्तिक घरांची निर्मिती होणार आहे.
– गिरीश बापट, पालकमंत्री