‘पवनाथडी’ जत्रा सांगवीतच का?, पिंपरी-चिंचवड शहराच्या मध्यभागी घ्यावी

0

मनसेच्या महिला आघाडीची मागणी, महापौरांसह आयुक्तांना निवेदन

पिंपरी ः पिंपरी चिंचवड शहरातील महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ उपलब्ध व्हावी, याकरिता महापालिकेकडून दरवर्षी पवनाथडी जत्रा भरविण्यात येते. मात्र, शहरातील सर्व करदात्या नागरिकांच्या पैशातून भरविणारी यात्रा, दरवर्षी राजकीय नेत्यांचा इव्हेंट होवू लागली आहे. त्यानूसार यंदा सलग तिस-या वर्षी सांगवीत ही जत्रा भरविली जाणार आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहराच्या मध्यभागी ही जत्रा भरविण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना यांनी केली आहे. याबाबत महापौर उषा ढोरे आणि आयुक्त श्रावण हर्डिकर यांना निवेदन आहे. त्यात म्हटले की, महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीकडून महिला बचत गटांना बाजारपेठ उपलब्ध होवून महिला उद्योजक बनावेत, आर्थिक सक्षम व्हाव्यात म्हणून पवनाथडी जत्रेचे आयोजन दरवर्षी केले जाते. ही जत्रा महापालिकेच्या खर्चातून केली जाते.

पवनाथडी जत्रेत राजकारण…

दरम्यान, यंदा सलग तिसर्‍या वर्षीही पवनाथडी सांगवी भरविली जात आहे. त्यामुळे शहरातील सर्वच महिला बचत गटांना ते ठिकाण सोयीस्कर होणार नाही. अनेक महिला बचत गट नाराज आहेत. शहरातील सर्व महिला बचत गटाच्या सोयीनुसार आपण पवनाथडीचे ठिकाण निश्‍चित करणे अपेक्षित आहे. परंतू, पवनाथडी जत्रेत राजकारण चालू आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील सर्व महिला बचत गटांना सोयीचे व योग्य, शहराच्या मध्यभागी असणारे ठिकाण असायला हवे, अशी मागणी मनसेच्या सीमा बेलापूरकर, अश्‍विनी बांगर,संगिता देशमुख, अनिता पाचांळ, सुचिता वाघमारे, श्रध्दा देशमुख, दक्षता क्षीरसागर, दुर्गा पवार आदी महिला पदाधिकार्‍यांनी महापौर ढोरे यांना निवेदन दिले आहे.