पहुरच्या लाचखोर शिपायाला दोन दिवसांची पोलिस कोठडी

0 1

घराला वारस लावण्यासाठी स्वीकारली होती तीन हजारांची लाच

जळगाव- घराला वारस लावण्यासाठी तीन हजारांची लाच स्वीकारणार्‍या जामनेर तालुक्यातील पहुरच्या परीरक्षण भुमापक कार्यालयातील शिपाई आप्पा बाबुलाल सोनार (45) यांना जळगाव एसीबीने 1 रोजी पाळधी बसस्थानकाजवळून अटक केली होती. 2 रोजी आरोपीला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

वारस लावण्याच्या कामासाठी स्वीकारली लाच
जामनेर तालुक्यातील 29 वर्षीय तक्रारदाराचे वडील मयत झाल्याने घराला वारस लावण्यासाठी अर्ज करण्यात आला होता मात्र वरीष्ठ अधिकार्‍यांकडून वारस लावण्याचे काम करून देण्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडे आरोपी सोनार यांनी तीन हजार लाचेची मागणी केल्याने जळगाव एसीबीकडे 1 रोजी तक्रार करण्यात आली होती. आरोपीने पाळधी बसस्थानकाजवळ लाच देण्यासाठी तक्रारदाराला बोलावल्यानंतर सापळा रचण्यात आला. जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक जी.एम.ठाकुर, निरीक्षक निलेश लोधी, हवालदार अशोक अहिरे, मनोज जोशी, शामकांत पाटील, प्रशांत ठाकुर, प्रवीण पाटील, अरुण पाटील, नासीर देशमुख, ईश्वर धनगर आदींनी आरोपी लाच स्वीकारत असताना त्याच्यावर झडप घातली.