पाणीपट्टी बील वाटप ठेका देण्यात पदाधिकारी, अधिकार्‍यांना मलिदा

0

जीवन प्राधीकरण, महावितरणपेक्षा सात पट अधिक दर

सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांचा आरोप

पिंपरी-चिंचवड : महापालिकेच्या वतीने पाणीपट्टी देयके वाटप करण्याचे काम क्रॅनबेरी कंपनीला पाच वर्षांसाठी दिले आहे. यासाठी पहिल्या वर्षासाठी त्यांना 40 रुपये 50 दराने व दरवर्षी यामध्ये पाच टक्के वाढ करून रक्कम देण्यात येणार आहे. पाच वर्षांत ही रक्कम 11 कोटी 76 लाख 32 हजार 960 रुपये होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर असेच बिल वाटपाचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून प्रतीबिले 7 रुपये 69 पैसे तर महावितरणकडून प्रतीबिले 6 रुपये 50 पैसे काम दिलेले आहे. यामुळे ठेकेदाराचे काम तात्काळ रद्द करून या कामासाठी फेर निविदा मागवाव्यात झालेले नुकसान संबंधित पदाधिकारी अधिकार्‍यांकडून वसूल करावे, दोषींवर 8 दिवसांत फौजदारी कार्यवाही करावी. जर आपण अशी कार्यवाही केली नाही तर आपणही यात सहभागी आहात असे समजून आपल्या वर व यातील सामील पदाधिकारी व अधिकार्‍यांवर कायदेशीर न्यायालयाच्या मार्गाने कार्यवाही केली जाईल, असा इशारा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व शिवसेनेचे माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी आयुक्त श्रावण हर्डिकर यांना दिला आहे.

‘राष्ट्रवादी’ने वाढविले दर
निवेदनात म्हटले आहे की, मे.क्रॅनबेरी एनएक्स सर्व्हिसेस प्रा.लि. या ठेकेदाराला शहरातील पाणीपट्टीची देयके वाटप करण्यासाठी आयुक्तांंनी 11 जानेवारी 2016 रोजी स्थायी समितीकडे प्रस्ताव पाठविला. यानंतर हा ठराव क्रमांक 14968, 3 फेब्रुवारी 2016 रोजी मंजूर केला आहे. 24 फेब्रुवारी 2016 ला कामाचा आदेश देण्यात आला. यामध्ये पाच वर्षांसाठी नेमणूक देण्यात आली. यापूर्वी देखील हे काम याच कंपनीला दिले होते. त्यावेळी याचे दर 27 रुपये प्रती बिल असे होते. परंतु कामाच्या स्कोपमध्ये वाढ केली, या सबबीखाली राष्ट्रवादीची सत्ता असताना फेब्रुवारी 2016 पासून दर वाढवून 45 रुपये 50 पैसे केलेले आहेत. हे काम सुरु होऊन या कंपनीला 28 महिने झालेे असून आणखी 32 महिने याच दराने काम करून घेण्याचा निर्णय मनपाने घेतलेला आहे.

तुलनेत बीलांचा दर्जा खराब
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व एम.एस.इ.बी (महावितरण) त्यांची बिले (देयके) प्रती महा. देत असून महावितरणची बिले फोर कलर, कागदाचा दर्जा उत्तम, कागद साईज मोठी, दोन्ही बाजूने प्रिंट, मीटर चा फोटो, एक वर्षाच्या बिलाची डीटेल्स अशा पद्धतीने देतात तर पिंपरी चिंचवड महापालिका मे.क्रॅनबेरी एनएक्स सर्व्हिसेस प्रा.लि. या ठेकेदाराच्या माध्यमातून 3 महिन्याला बिल (देयके) देतात. हि बिले देताना पी.एम.पी.एम.एल.च्या पंचिंग मशीन प्रमाणे अथवा हॉटेलमधील जेवणाचे बिल इलेक्ट्रोनिक मशीन देतात तशाच पद्धतीने मनपा इलेक्ट्रोनिक मशीन मधून छोट्या साईजच्या कागदावर बिले देते. यामध्ये 24/02/2016 पासून या 28 महिन्यांच्या कालावधी पूर्ण झाला आहे.

करदात्यांचे सात कोटी नुकसान
आणखी 32 महिने याच दराने पैसे अदा केले जाणार आहे. यात दरवर्षी 5% ची वाढ धरून पिंपरी चिंचवडच्या करदात्या नागरिकांचे एकूण र.रु 7,03,56,220 इतक्या रक्कमेचे नुकसान होणार आहे. पारदर्शक कारभाराची हमी देणार्‍या भाजपची सत्ता आल्या नंतर यावर पुन: विचार होईल असे वाटले होते. परंतु मागच्या 16 महिन्यांत अधिकारी पदाधिकार्‍यांनी आपले हफ्ते वाढवून घेऊन याला मूक संमती दिली, असेही निवेदनात म्हटले आहे.