पायलटांच्या बरखास्तीनंतर कॉंग्रेसची राजस्थानमध्ये मोठी घोषणा; मोठे फेरबदल

0

जयपूर: राजस्थानमध्ये सचिन पायलट यांनी बंड केल्याने त्यांच्यावर कॉंग्रेसने कारवाई केली. त्यांच्याकडील उपमुख्यमंत्री तसेच प्रदेशाध्यक्ष पद काढून घेण्यात आले आहे. त्यानंतर आता कॉंग्रेसने गावपातळीपासून राज्य पातळीवर मोठे फेरबदल केले आहे. राजस्थानमध्ये सर्व जिल्हा व गट समित्या बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे. राजस्थानचे प्रभारी प्रदेशाध्यक्ष अविनाश पांडे यांनी ही माहिती दिली. ट्विट करत त्यांनी ही माहिती दिली आहे.

माजी उपमुख्यमंत्री व काँग्रेसचे नेते सचिन पायलट यांनी बंड पुकारल्यामुळे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या नेतृत्त्वाखालील काँग्रेसचं राजस्थानमधील सरकार अडचणीत सापडले होते. अशोक गेहलोत व पायलट यांच्यामधील मतभेद प्रथमच टोकाला पोहचल्याचे बघायले मिळाले. रविवारपासून सुरू झालेल्या या राजकीय बंडामुळे राजस्थानात बऱ्याच घडामोडी घडल्या. काँग्रेसने सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष पदावरून दूर केले. त्यानंतर आता संपूर्ण राजस्थानमध्ये नव्याने पक्ष बांधणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

कॉंग्रेस प्रभारी अविनाश पांडे यांनी सचिन पायलट यांच्याविषयी एक ट्विट केले आहे. ‘सचिन पायलट यांच्यासाठी पक्षाचे दरवाजे बंद झालेले नाहीत. ईश्वर त्यांना सद्बु्द्धी देवो आणि त्यांना त्यांची चूक समजून यावी. भाजपाच्या मायावी जाळ्यातून ते बाहेर निघून यावे, अशीच माझी प्रार्थना आहे, असे पांडे यांनी म्हटले आहे.