पालिकेने लोकसंख्येचे पुरावे द्यावे

0

पाटबंधारे विभागाचे आदेश : थकबाकी तातडीने भरा

पुणे : महापालिकेसोबतचा पाणी वाटपाचा नव्याने करार करण्यापूर्वी पालिकेने शहरात 52 लाख नागरिक राहात असतील तर त्यांचे आधारकार्डचे पुरावे द्यावेत. पाणी बिलाची 72 कोटी रुपयांची थकबाकी तातडीने भरावी, असे पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांनी बुधवारी महापालिका अधिकार्‍यांसोबत झालेल्या बैठकीत सांगितले आहे. पुणे महापालिकेचा पुण्याच्या पाण्यासंदर्भात पाटबंधारे विभागासोबत केलेला करार गुरुवारी संपला. या कराराचे नुतनीकरणाच्या दृष्टीने महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी बुधवारी पाटबंधारे विभागाचे अधिकारी आणि महापालिकेच्या अधिकार्‍यांच्या संयुक्त बैठकीमध्ये चर्चा केली.

17 टीएमसीचा प्रस्ताव

महापालिकेने शहरात निवासी आणि फ्लोटींग अशी मिळून 52 लाख लोकसंख्या आहे. यासाठी धरणसाखळीतून 17 टीएमसी पाणी मिळावे, असा प्रस्ताव पाटबंधारे विभागाला दिला आहे. सध्या साडेअकरा टीएमसीचा करार असून, प्रत्यक्षात महापालिका अधिकचे पाणी उचलते. या प्रस्तावामध्ये शहरातील महाविद्यालये, विद्यापीठ येथील वसतिगृहात राहणार्‍या विद्यार्थ्यांचा तसेच विविध कामानिमित्त, व्यवसायानिमित्ताने शहरात दररोज येणार्‍या नागरिकांचाही विचार करण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांच्याही आधारची मागणी

बैठकीमध्ये पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांनी महापालिकेच्या हद्दीमध्ये आधार नोंदणी केलेल्या नागरिकांची संख्या पुराव्यानिशी मागितली आहे. तसेच हॉस्टेलमध्ये राहणार्‍या विद्यार्थ्यांचीही आधार नोंदणीची माहिती मागितली आहे. हे विद्यार्थी इतर जिल्ह्यातील आणि राज्यातील असल्याने त्यांच्या आधार नोंदणीची माहिती स्थानिक प्रशासनाकडे नसल्याचे महापालिकेच्या अधिकार्‍यांनी सांगितल्यानंतरही पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांनी ते मान्य केले नाही.