Saturday , February 23 2019
Breaking News

पाहूनी समाधीचा सोहळा!  दाटला इंद्रायणीचा गळा!! 

ज्ञानेश्‍वर महाराजांचा 723 वा संजीवन समाधी दिन सोहळा साजरा
हरिनाम जयघोषात घंटानाद; हृदयस्पर्शी कीर्तनाने पाणावले भाविकांचे डोळे
आळंदी :  ज्ञानेश्‍वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, पुंडलिक वरदे हरी विठ्ठल महानाम जयघोष, कीर्तनातील जयघोष.. बाराचे सुमारास घंटानाद.. याच वेळी श्रींचे समाधीवर पुष्पवृष्टी.. संत नामदेव महाराज पादुका मूर्ती व माऊलींचे समाधीची भेट.. आणि हृदयस्पर्शी कीर्तन सेवेने भाविकांचे पाणावलेले डोळे.. अशा भक्तिभावमय वातावरणात संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराजांचा 723 वा संजीवन समाधी सोहळा बुधवारी (दि.5) नाम जयघोष करीत साजरा झाला.
संतश्रेष्ठ श्री ज्ञानदेवांनी कार्तिक महिन्यातील त्रयोदशीला संजीवन समाधी घेतल्याचा या 723 व्या  संजीवन समाधी दिनी वारकर्‍यांना गहिवरून आले. श्रींच्या समाधीवर या दिवशी माथा टेकून श्रींचे दर्शन घेण्यास वारकर्‍यांच्या मनात भावना असते. अलंकापुरीत संजीवन समाधी सोहळ्यासाठी आलेल्या भाविकांनी पवित्र इंद्रायणी नदीत स्नान करून सोहळ्यास हजेरी लावत श्रींचे दर्शन घेतले.
राज्यभरातून भाविकांची रिघ
महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून आलेल्या भाविकांनी श्रींचे संजीवन समाधीचे डोळे भरून दर्शन घेण्यास एकच गर्दी केली. पहाटे तीनच्या सुमारास प्रमुख विश्‍वस्त विकास ढगे पाटील यांचे हस्ते श्रीना पवमान अभिषेक झाला. यात माऊलींना पवमान अभिषेक व दुधारती घालून पूजा झाली.यावेळी राहुल जोशी यांनी पौरोहित्य केले. सकाळी अकरापर्यंत भाविकांच्या महापूजा,दर्शन व नामदेवराय यांच्या वतीने श्रींची पहाट पूजा झाली.सकाळी वीणा मंडपात देवस्थानच्या वतीने कीर्तन झाले.
पाहूनी समाधीचा सोहळा ! दाटला इंद्रायणीचा गळा !!
बाळ सिद्ध पाहता चिमुकला ! कुणी गहिवरे कुणी हळहळे\ ब्रम्हवृंद संत जगी अवतरले…
ब्रम्हवृंद संत जगी अवतरले
मुख्य संजीवन समाधी दिन सोहळ्याला सुरुवात झाली. सकाळी दहाला संत नामदेव महाराजांचे वंशज ह.भ.प केशव महाराज नामदास यांचे कीर्तन सुरू झाले. ‘ब्रम्हवृंद संत जगी अवतरले’ या नामदेवरायांचे संजीवन समाधी प्रसंग अभंगावर आधारित वेळी वीणा मंडपात या कीर्तनाचा लाभ घेण्यासाठी भाविकांची मोठी रिघ लागली होती. नामदास महाराज यांनी भक्तिभावमय वातावरणात मंत्रमुग्ध करीत कीर्तन सेवा केली.तत्पूर्वी मंदिराच्या महाद्वारात काल्याचे कीर्तन मालक बाळासाहेब आरफळकर यांचे वतीने गणेशानंद महाराज पुणेकर यांचे झाले.
नामदेवरायांच्या पादुका समाधीपुढे
त्यानंतर मंदिरात हैबतबाबा दिंडीचे आगमन झाले. टाळ-मृदंगाच्या निनादात हैबतबाबांच्या दिंडीने समाधी मंदिरास प्रदक्षिणा पूर्ण करून ज्ञानदेवांचा जयघोष केला. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास संजीवन समाधी सोहळ्याच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. घंटानाद,अभिषेक आणि माऊलींच्या समाधीवर विविध फुलांची वृष्टी झाल्यानंतर श्रींची आरती घेण्यात आली. संत नामदेव महाराजांच्या पादुका त्यांच्या वंशजांमार्फत वीणामंडपातून कारंजा मंडप, पंखा मंडप व मुख्य गाभार्यात माऊलींच्या समाधीपुढे विराजमान करण्यात आल्या. त्यानंतर माऊलींना महानैवेद्य देऊन नामदेवरायांचे वंशज नामदास परिवारासह, मानकरी, प्रमुख मान्यवरांना नारळ-प्रसाद संस्थानचे वतीने देण्यात आला. हरिनाम गजरात शहरात माउलींचा संजीवन समाधी दिन सोहळा साजरा झाला.आळंदी नगरपरिषदेने विविध सेवा सुविधा देत भाविकांना नागरी सेवा दिल्या.
यांची होती उपस्थिती
यावेळी जलसंपदा मंत्री विजय शिवतारे, प्रमुख विश्‍वस्त विकास ढगे पाटील, माजी विश्‍वस्त चंद्रकांत डोके, सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर, नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, यात्रा समिती सभापती पारुबाई तापकीर, माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर पाटील, बबनराव कुर्‍हाडे, जिल्हा प्रमुख राम गावडे, श्रींचे चोपदार बाळासाहेब चोपदार, राजाभाऊ चोपदार, रामभाऊ चोपदार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र चौधरी, माजी नगरसेवक डी. डी. भोसले, माउली ग्रुपचे प्रमुख माऊली गुळुंजकर, व्यवस्थापक ज्ञानेश्‍वर वीर, संजय रणदिवे, श्रीधर सरनाईक, मानकरी योगेश आरु, ज्ञानेश्‍वर कुर्‍हाडे, आळंदी नगरपरिषदेचे आजी माजी नगरसेवक पदाधिकारी, महाराज, फडकरी, दिंडीकरी, मानकरी उपस्थित होते.
Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  

हे देखील वाचा

निवडणुकीपूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षकांची उचलबांगडी होणार?

मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव पाठविल्याचे खात्रिलायक वृत्त पंतप्रधानांच्या चोरुन चित्रीकरणाचा ठपका ठेवल्याचीही चर्चा कर्मचार्‍यांमध्ये दिवसभर गुर्‍हाळ  जळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: Content is protected !!