पिंपरी-चिंचवडमधील दोन पोलीस निरीक्षकांच्या जिल्हाबाह्य बदल्या

0 1
पिंपरी-लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील दोन पोलीस निरीक्षकांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या करण्यात आल्या आहेत. याबाबतचे आदेश बुधवारी (दि. 20) अप्पर पोलीस महासंचालकांनी काढले. याच पार्श्वभूमीवर औरंगाबाद शहर येथील दोन पोलीस निरीक्षकांची पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात बदली करण्यात आली आहे.
पोलीस निरीक्षक नरेंद्र विक्रम जाधव यांची औरंगाबाद शहर येथे बदली करण्यात आली आहे. तर पोलीस निरीक्षक अरविंद बळीराम जोंधळे यांची अहमदनगर येथे बदली करण्यात आली आहे. औरंगाबाद शहर येथून पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर डी. साबळे आणि मनीष एम कल्याणकर यांची पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात बदली करण्यात आली आहे.
यापूर्वी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील 12 वरिष्ठ पोलीस निरीक्षक, 13 सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि 50 पोलीस उपनिरीक्षक आणि 43 पोलीस कर्मचाऱ्यांच्या सोमवारी (दि. १८) अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत.
आस्थापना मंडळामधील चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक भानुदास जाधव यांची गुन्हेशाखा युनिट दोनच्या निरीक्षकपदी तर गुन्हेशाखा युनिट दोनचे सुधाकर काटे यांची तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. चिखली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांची सायबर सेलच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर आर्थिक गुन्हेशाखेचे श्रीराम पौळ यांच्याकडे चिखलीचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. निगडीचे वरिष्ठ निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांची पिंपरी वाहतूक विभागाच्या निरीक्षकपदी तर पिंपरी वाहतूकचे उमेश तावस्कर यांची वाहतूक नियंत्रणकक्षात नियुक्ती करण्यात आली आहे.
तसेच विशेष शाखेचे वरिष्ठ निरीक्षक भीमराव शिंगाडे यांच्याकडे निगडीच्या वरिष्ठ निरीक्षकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. भोसरी एमआयडीसीचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र कुंटे यांना नियंत्रणकक्षात संलग्न करण्यात आले आहे. तर भोसरी एमआयडीसीचे निरीक्षक सतिश नांदूरकर यांच्याकडे वरिष्ठ  निरीक्षकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. चिखली पोलीस ठाण्याचे निरीक्षक (गुन्हे) शंकर अवताडे यांची देहूरोड वाहतूक निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली असून, देहूरोड वाहतूकचे सतिश पवार यांची आळंदीच्या वरिष्ठ निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आळंदीचे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र चौधर यांना नियंत्रणकक्षात संलग्न करण्यात आले आहे.