पिंपरी-चिंचवडमध्ये अद्ययावत शासकीय ग्रंथालय सुरू करा

0

आमदार लक्ष्मण जगतापांची उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालयाकडे मागणी

पिंपरी ः राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत पिंपरी-चिंचवडमध्ये अद्ययावत शासकीय ग्रंथालय सुरू करण्यात यावे, अशी मागणी चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे. तसेच या ग्रंथालयाच्या उभारणीसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत सर्वतोपरी सहकार्य करण्याची तयारीही आमदार जगताप यांनी दर्शविली आहे. यासंदर्भात आमदार लक्ष्मण जगताप यांनी मंत्री उदय सामंत यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या आजमितीला 20 लाखांहून अधिक आहे. एवढ्या मोठ्या लोकसंख्येचा विचार करता शहरातील विद्यार्थी, रसिक, वाचन प्रेमी, बालवाचक, स्पर्धा परीक्षा देणारे परीक्षार्थी, कामगार, शहराच्या आसपासच्या भागातील शेतकरी बांधवांसाठी शेतीपयोगी तसेच सर्वांच्या आवडीनिवडीनुसार आवश्यक ते सर्व ग्रंथ, वृत्तपत्रे, मासिक, साप्ताहिक उपलब्ध होण्याबरोबरच ज्ञान व माहिती संग्रहण करण्यासाठी शहरात एकही मोठे ग्रंथालय नाही. मूळची उद्योगनगरी असलेल्या या शहराची स्मार्ट सिटीकडे वाटचाल होत असताना शहरात शासकीय ग्रंथालय आवश्यक आहे.

राज्य शासनाने ‘वाचाल तर वाचाल, गाव तेथे ग्रंथालय’ अशी घोषणा देत समाज सुसंकृत व सुजनशील बनावा म्हणून सुरु केलेली ग्रंथालय ही लोक जागरणाची चळवळ महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनाचा अविभाज्य घटक झाली आहे. शैक्षणिक व सामाजिक घटकांच्या गरजांची पूर्तता, विविध प्रकारच्या शैक्षणिक वाचनाची आवड, सुसंकृत व्यक्तिमत्व, चांगल्या व वाईटाची जाणीव निर्माण करण्याचे कार्य सुसज्ज ग्रंथालयाच्या माध्यमातून होत असते. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरात अद्ययावत शासकीय ग्रंथालय सुरु करण्यात यावेत. त्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत आवश्यक असलेले सहकार्य करण्याची तयारी आमदार जगताप यांनी दर्शविली आहे.