पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्व रूग्णालयात अद्ययवात गॅस पाईपलाईन हवी – उपमहापौर तुषार हिंगे

0

आयुक्तांना सूचना

पिंपरी :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने भोसरीच्या नव्या रूग्णालयासाठी मेडिकल गॅस पाईपलाईन केले जाणार आहे. त्यासाठी दरपत्रक मागविण्यात आले आहेत. मात्र, त्या पाईपलाईनचा दर्जा खूपच सुमार असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे अद्ययावत व उच्च दर्जाचे गॅस पाईपलाईन बसविण्याची अट समाविष्ट केली जावी, अशी सूचना उपमहापौर तुषार हिंगे यांनी केली आहे. त्यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे यासंदर्भात पत्र दिले आहे. पालिकेच्या वैद्यकीय विभागाने भोसरीच्या नव्या रूग्णालयासाठी मेडिकल गॅस पाईपलाईनच्या निविदा प्रक्रियेसाठी दरपत्रक मागविले आहे. त्या अनुषंगाने वैद्यकीय विभागाने ज्या तांत्रिक मुद्दे दिले आहेत. त्याबाबत त्या क्षेत्रातील तज्ज्ञांकडे विचारणा केल्यानंतर त्यात खूप मोठ्या प्रमाणात त्रुटी असल्याचे निदर्शनास आले आहे.

तांत्रिक मुद्दयामध्ये मेडिकल कॉन्सिल ऑफ इंडिया (एमसीआय) ची दर्जात्मक मानके निश्‍चित केली आहेत. वास्तविक पाहता नमूद केलेले दोन्ही दर्जात्मक मानांके मेडिकल गॅस पाईपलाईनच्या संदर्भात लागू होत नाहीत. वरील सर्व प्रकार पुरवठादारांची दिशाभूल करून ठराविक लोकांच्या सोयीकरीता संभ्रम निर्माण केल्याचे दिसून येते, असा आरोप तुषार हिंगे यांनी केला आहे.

जागतिक दर्जाचे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे परिपुर्ण अशी परदेशी बनावटीची गॅस पाईपलाईनची पद्धत कार्यान्वित करावी. एमसीआयच्या नियमानुसार देशातील सर्व नामांकित रूग्णालयात गॅस पाईपलाईनचे काम केले जाते. त्यानुसार पालिकेने कार्यवाही करावी. नवीन पाईपलाईनसाठी सल्लागारांचा सल्ला घ्यावा. सध्याची कोटेशन नोटीस रद्द करावी. नव्या मागणीनुसार पाईपलाईन न केल्यास कोणतीही दुर्घटना घडल्यास त्यास प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा हिंगे यांनी दिला आहे. तांत्रिक मुद्दयातील त्रुटीबाबत अहवाल निवेदनासोबत तुषार हिंगे यांनी आयुक्तांना सादर केला आहे.