पिंपळगावच्या पिता-पुत्राची रेल्वेखाली आत्महत्या

0

कौटुंबिक कलहातून टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय

भुसावळ- तालुक्यातील पिंपळगाव बु.॥ येथील पिता-पूत्राने संतापाच्या भरात रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना रविवारी रात्री 12.30 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी सुरुवातीला वरणगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हातमजुरी करणार्‍या संदीप पंढरीनाथ बावस्कर (36) या ईसमाचे कुटुंबियांशी रविवारी रात्री काहीतरी भांडण झाल्याची माहिती असून त्याने आपला नऊ वर्षीय मुलगा संकेत संदीप बावस्करला सोबत घेत आचेगावजवळील रेल्वे पुल गाठून रात्री 12.30 वाजेच्या सुमारास कुठल्यातरी रेल्वेखाली झोकून दिल्याने उभयंतांचा मृत्यू ओढवला. रेल्वे गँगमनला दोघांचे मृतदेह अप रेल्वे लाईनवरील खांबा क्रमांक 463/13 जवळ आढळल्यानंतर वरणगाव पोलिसांना माहिती दिल्यानंतर घटनेचा उलगडा झाला. या प्रकरणी वरणगाव पोलिसात अशोक केदारे यांच्या खबरीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश परदेशी, अशोक जावरे करीत आहेत.