पिस्तूलाचा धाक दाखवून डॉक्टरांच्या गळ्यातील सोन्याची चैन तोडून नेली

1

दिक्षीतवाडीत वर्दळीच्या रस्त्यावरील अर्थव क्लिनिकमधील घटना ; संशयित 20 ते 24 वयोगटातील

जळगाव : अंगाला खास सुटली असे सांगून डॉक्टरांकडून तपासणी करुन घेतली. तपासणीनंतर डॉक्टर औषधी लिहून देण्यासाठी माहिती विचारत असतांनाच रुग्ण आणि त्याच्यासोबत एकाने रिव्हॉल्वरचा धाक दाखवून डॉ. महेंद्र मधुकर पाटील (वय 39, रा.शिवराम नगर, ) यांच्या गळ्यातील 30 ते 40 हजार रुपयांची चैन तोडून नेल्याची घटना शनिवारी रात्री 9.45 वाजेच्या सुमारास दिक्षीतवाडीत वर्दळीच्या रस्त्यावरील अर्थव क्लिनिकमध्ये घडली. संशयितासोबत आणखी दोघे होते त्यांनी कम्पाऊंडरला आवाज केला तर मारुन टाकेन अशी धमकीही दिली. यानंतर चैन तोडल्यावर दोन जण पायी तर दोघे दुचाकीवरुन पसार झाले. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची तपासणी करुन जिल्हापेठ पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे. संशयित 20 ते 24 वयोगटातील असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

पिस्तूल रोखून चैन तोडून नेली
शहरात आमदार चंदूलाल पटेल राहत असलेल्या शिवराम नगरात डॉ. महेंद्र मधुकर पाटील हे कुटुंबांसह राहतात. त्यांचे दिक्षितवाडी जळगाव पिपल्स बँकेशेजारी अर्थव क्लिनिक नावाचा दवाखाना आहे. याठिकाणी सकाळी 11 ते दुपारी 1 व रात्री 8 ते 10 वाजेपर्यंत रुग्णांची तपासणी करण्यात येते. दवाखान्यात कम्पाऊंड म्हणून गोपाळ भास्कर सोनवणे कामाला आहे. शनिवारी रात्री 9.45 वाजेच्या सुमारास रुमाल बांधलेला तरुण आला. अंगाला खाज सुटली आहे असे तरुणाने सांगितल्याने डॉ. महेंद्र पाटील यांनी तरुणाला परदा लावून घेत त्याची तपासणी केली. तोंडालाही खाज सुटल्याबाबत काही आहे का म्हणून तरुणाला डॉक्टरांनी रुमाल बाजूला करण्यास सांगितले. त्याने थोडासा रुमाल खाली करुन पुन्हा लावून घेतला. तपासल्यानंतर डॉक्टर औषधी लिहून देण्यासाठी माहिती विचारणार तोच रुमाल बांधलेल्या तरुणासोबत आलेल्या एकाने त्याच्याकडील रिव्हॉल्वर काढून डॉक्टरांवर रोखली. यादरम्यान रुमाल बांधलेल्या तरुणाने डॉक्टरांच्या गळ्यातील चैन ओढून नेली.

आवाज केला तर मारुन टाकेन
या दोघांसोबत आणखी दोन जण कॅबिनच्या बाहेर होते. त्यातील एकाने कम्पाऊंडर गोपाल सोनवणे याची गच्ची पकडली. आवाज केला तर मारुन टाकेन अशी धमकी दिली. भितीने सोनवणे तसेच डॉ. महेंद्र पाटील यांनीही कुठलीही हालचाल केली नाही. सोन्याची चैन तोडल्यानंतर कॅबिनमधील दोघे इसम पळून गेले. त्याच्या पाठोपाठ धमकी देणारे दोघेही त्यांनी आणलेल्या दुचाकीवरुन पांडे चौकाकडे पसार झाले. या घटनेबाबत डॉ. पाटील यांनी त्यांचे मित्र धनराज चौधरी, डॉ. जितेंद्र विसपुते, डॉ. कुणाल नारखेडे यांना सांगितले. त्याच्यासोबत डॉ. पाटील रात्री 11 वाजता जिल्हापेठ पोलीस ठाणे गाठले.

चौघांमधील एक संशयित रेकॉर्डवरील गुन्हेगार
तक्रार देण्यास आलेल्या डॉ. पाटील यांना पोलिसांनी संशयित निष्पन्न करण्यासाठी रेकॉर्डवरील गुन्हेगारांचे फोटो दाखविले. यातील एकास डॉ. पाटील यांनी ओळखले आहे. त्यानेच गळ्यातील चैन तोडल्याचेही डॉक्टरांनी पोलिसांना सांगितले. याठिकाणी डॉक्टरांनी दिलेल्या तक्रारीवरुन जिल्हापेठ पोलीस ठाण्यात निष्पन्न झालेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगारासह अज्ञात तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला. पसार होतांना संशयितांची हातून पडलेला चैनचा तीन इंचांचा तुकडा दवाखान्यात मिळून आला आहे. जिल्हापेठ पोलिसांनी रविवारी पुन्हा डॉक्टरांकडून संबंधित संशयितांचे वर्णन तसेच माहिती जाणून घेतली. संशयित मराठी भाषेत बोलत होते, व 20 ते 24 वर्ष वयोगटातील असल्याची माहिती डॉक्टरांनी पोलिसांना दिली. संशयितांना डॉक्टरांबद्दल माहिती असण्याची शक्यता असते.

वर्दळीच्या रस्त्यावरील प्रकाराने खळबळ
पांडे चौकातून नेरीनाक्याकडे जाणारा असा जळगावचे प्रवेशव्दार म्हणून हा रस्ता ओळखला जातो. दिवसभर तसेच रात्रीच्या वेळी याठिकाणाहून वाहनांची वर्दळ असते. अशा वर्दळीच्या रस्त्यावर असलेल्या अथर्व क्लिनिकमध्ये चैन लांबवून नेल्याचा प्रकार घडल्याने येथील रहिवाशांसह दुकानदारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान रात्री 10 वाजेच्या सुमारास जिल्हापेठ पोलिसांचे वाहन गस्त घालत असतात. याचदरम्यान प्रकार घडल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. पोलिसांचा धाक संपला की काय असाही सवाल उपस्थित होत आहे.