Sunday , March 18 2018

पीएनबी घोटाळा 30,000 कोटींचा!

मोदीचा 17 बँकांना 3000 कोटींचा चुना

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळा हा तब्बल 30 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचा असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे. नीरव मोदी व मेहुल चोकशी यांना दिलेल्या लेटर ऑफ अंडरस्टॅण्डिंगमुळे पीएनबीचे केवळ 11400 कोटी रुपयांचेच नुकसान झाले नाही तर वास्तविक पाहाता या बँकेला 30 हजार कोटीपेक्षा अधिक रकमेचा चुना लावण्यात आला आहे, असेही सुरजेवाला यांनी सांगितले. या घोटाळ्याची माहिती केंद्र सरकारकडे होती. पंतप्रधानांचे कार्यालय (पीएमओ), ईडी, फ्रॉड एन्वेस्टिंग ऑफिस, कार्पोरेट मंत्रालय यांच्याकडे 7 मे 2015 रोजीच या घोटाळ्याची सर्व माहिती पोहोचली होती. तरीदेखील 31 जानेवारीपर्यंत घोटाळेबाजांवर काहीच कारवाई करण्यात आली नाही, अशी माहितीही सूरजेवाला यांनी पत्रकारांना दिली. विशेष बाब म्हणजे, नीरव मोदीने केवळ पीएनबीलाच फसविले नाही तर आणखी 17 बँकांना तीन हजार कोटींना गंडविल्याचेही उघडकीस आले आहे. हे घोटाळा करण्यासाठीही मोदीने लेटर ऑफ अंडरस्टॅण्डिंगचा वापर केला असल्याचे सामोरे आले आहे. या फसवणुकीमुळे या बँकांचे तीन हजार कोटी बुडाल्यात जमा आहे.

पीएनबीचे 18 कर्मचारी निलंबित
या घोटाळ्याप्रकरणी बँकेतील आणखी 8 कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आले आहे. यामुळे गेल्या दोन दिवसांमध्ये या घोटाळ्यासाठी निलंबित करण्यात आलेल्या अधिकार्‍यांची संख्या 18 वर जाऊन पोहोचली आहे. निलंबित कर्मचार्‍यांमध्ये अनेक बड्या अधिकार्‍यांचा समावेश असून, अद्याप त्यांचे नावे बँकेकडून जाहीर करण्यात आलेली नाहीत. बँकेबरोबर या घोटाळ्यातील मुख्य संशयित नीरव मोदी याचीदेखील चौकशी पोलिसांनी सुरु केली आहे. मोदी अद्याप फरार असून पोलिसांनी मोदी यांच्या मालकीच्या मालमत्तेवर छापे टाकण्यास सुरुवात केली आहे. काल दिवसभरात तसेच आज सकाळीदेखील पोलिसांनी मोदी यांच्या मुंबईतील मालमत्तेवर छापे टाकून चौकशी करण्यास सुरुवात केली होती. तसेच नीरव मोदी आणि त्यांच्या कुटुंबासंबंधी एक नोटीसदेखील जारी करण्यात आली आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानेदेखील मोदी व चोकशी यांचे पासपोर्ट तातडीने रद्द केले असून, त्याना नोटीस जारी केली आहे.

पुण्यासह मुंबई, सूरतमध्ये सीबीआयचे छापे
पीएनबी हा देशातील दुसर्‍या क्रमांकाचा सर्वात मोठा घोटाळा ठरला आहे. त्याप्रकरणी पीएनबीने शुक्रवारी मेहुल चोकशी याच्याविरोधात सीबीआयकडे तक्रार दाखल केली आहे. चोकशीच्या तीन कंपन्यांनी मोदीसह या बँकेला चुना लावला आहे. सीबीआयने मोदी व चोकशी याच्या एकूण घरे व कंपन्या मिळून 26 ठिकाणी शुक्रवारी छापे टाकले. पुणे, मुंबई, सूरत, जयपूर आणि कोईम्बतूर येथेही सीबीआयने छापेमारी केली आहे.

पाच वर्षांत बँकांना 8670 कोटींचा चुना
रॉयटर्स या वृत्तसंस्थेने माहिती अधिकारामध्ये रिझर्व्ह बँकेकडून मिळवलेली आकडेवारी धक्कादायक आहे. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या पाच आर्थिक वर्षांमध्ये सरकारी बँकांमध्ये 8,670 कर्जघोटाळे झाले असून, एकूण 61,260 कोटी रुपयांना बँकांना चुना लावण्यात आला आहे. विशेष म्हणजे, ही आकडेवारी मार्च 2017 पर्यंतची असून यामध्ये पंजाब नॅशनल बँकेच्या 11,300 कोटी रुपयांचा समावेश नाही. कर्जघोटाळा म्हणजे ग्राहक बँकांकडून परत न फेडायचा विचार करूनच कर्ज घेतो. म्हणजे कर्ज घेतानाच बँकेला गंडा घालायचा त्याचा मानस असतो. बँकेमधल्या कर्जघोटाळ्यांची व्याप्ती इतकी मोठी आहे की गेल्या एकाच वर्षी 14,900 कोटी रुपयांची थकित कर्जे वाढली आहेत. विशेष म्हणजे, थकित किंवा बुडीत कर्जांचे प्रमाण गेल्या काही वर्षांपासून सातत्याने वाढत आहे. 2012-13 मध्ये 6,357 कोटी रुपयांच्या थकित कर्जांचे प्रमाण आता वर्षाला 17,634 कोटी रुपये इतके फुगले आहे.

हे देखील वाचा

पुढील निवडणुका मतपत्रिकेद्वारे?

मतपत्रिकांद्वारे मतदान घेण्यास भाजपाची तयारी सर्व पक्षांची संमती आवश्यक राम माधव यांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *