पुणे – एर्नाकुलम नवी एक्स्प्रेस

0

15 एप्रिलपासून पाच जूनपर्यंत ही गाडी सेवेत राहणार

पुणे : उन्हाळी हंगामातील प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन मध्य रेल्वे प्रशासनाने पुणे-एर्नाकुलम-पुणे एसी साप्ताहिक हमसफर एक्स्प्रेस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 15 एप्रिलपासून पाच जूनपर्यंत ही गाडी सेवेत राहणार आहे. पुण्याहून 15 एप्रिलला ही गाडी (01467) पहिल्यांदा सुटेल. ती दर सोमवारी सायंकाळी सात वाजून 55 मिनिटांनी सुटणार असून, बुधवारी मध्यरात्री दीड वाजता एर्नाकुलमला पोहोचणार आहे. तर, एर्नाकुलम येथून गाडी (01468) दर बुधवारी पहाटे पावणेचार वाजता पुण्यासाठी रवाना होणार आहे. ती दुसर्‍या दिवशी गुरुवारी पहाटे पावणेतीन वाजता पुण्यात दाखल होईल. या दोन्ही गाड्यांच्या प्रत्येकी आठ फेर्‍या होणार आहेत.
या गाडीला सुरुवातीच्या स्थानकांव्यतिरिक्त चिंचवड, लोणावळा, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमाळी, मडगाव, कारवार, कुमटा, मुरुडेश्वर, भटकळ, मुकांबिका रोड, कुंदापुरा, उडुपी, मुल्की, सुरत्काळ, मेंगळुरू जंक्शन, कासारगोड, कन्नुर, कोझिकोडे, शौरनोर, थ्रिसूर आणि अलुवा आदी थांबे देण्यात आले आहेत. या गाडीला वातानुकूलित 13 डबे जोडण्यात येणार आहेत.

पर्यटकांसाठी उपयुक्त

उन्हाळ्याच्या हंगामात शाळा-कॉलेजांना सुट्या असतात. त्यामुळे पर्यटनाला जाण्याचे प्रमाण वाढते. कोकण आणि दक्षिण भारतात पर्यटनांची अनेक ठिकाणे असल्याने पर्यटक आकर्षिले जातात. त्यांना कोकण रेल्वेने दक्षिण भारतात जाण्यासाठी ही गाडी उपयुक्त ठरणार आहे, असे रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे.