Sunday , March 18 2018

पुण्यात काँक्रिटीकरणाचा धडाका!

पुणे । समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत 1 हजार 400 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची खोदाई होणार असल्याने 12 मीटर रुंदीपर्यंतच्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण न करण्याचा आदेश आयुक्त कुणाल कुमार यांनी काढला आहे. मात्र, आयुक्तांचा हा आदेश धूडकावून शहरात सर्वत्र काँक्रिटीकरणाच्या कामांचा धडका सुरू आहे. आयुक्तांनी आदेशाचे पत्रक काढल्यानंतरही प्रशासनाकडून काँक्रिटीकरणासाठी निविदा प्रक्रिया राबविली आहे. त्यामुळे सर्वत्र काँक्रिटीकरणाचा धडाका सुरूच राहणार आहे. या काँक्रिटीकरणामुळे नागरिकही त्रस्त आहेत. शिवाय पाणी योजनेसाठी पुन्हा खोदाई होणार असल्याने सध्याची काँक्रिटीकरणाची कामे अनेक ठिकाणी पुन्हा उखडावी लागणार आहेत. त्यामुळे पुणेकरांच्या पैशाची ही उधळपट्टीच सुरू आहे.

166 कोटींच्या कामांना स्थायीची मान्यता
मार्चअखेपर्यंत अंदाजपत्रकात नगरसेवकांना देण्यात आलेला निधी संपविण्यासाठी गल्लीबोळातील, प्रमुख रस्त्यांसह जोडरस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची कामे सध्या शहरातील विविध प्रभागांमध्ये रात्रंदिवस सुरू आहेत. ही कामे झाल्यानंतर पाणी योजनेच्या कामासाठी पुन्हा रस्ते खोदाई करावी लागणार आहे. ही बाब खर्चिक आहे. त्यामुळे आयुक्तांनी कामे बंद करण्याचे संकेत दिल्यानंतर स्थायी समितीने त्याला विरोध केला होता. गल्लीबोळातील सिमेंट काँक्रिटीकरणाच्या 166 कोटींच्या कामांना स्थायी समितीने मान्यता दिली होती. यातील काही कामे निविदा मान्य होण्यापूर्वीच सुरू झाली असल्याच्या तक्रारीही प्रशासनाकडे करण्यात आल्या होत्या. नगरसेवक निधी संपविण्यासाठी लोकांच्याच पैशांचा गैरवापर करत आहेत. कारण सध्या सुरू असलेली काँक्रिटीकरणाची कामे ही पुन्हा उखडावी लागणार आहेत. याचाच अर्थ महापालिका आणि लोकप्रतिनिधींना लोकांच्या पैशांची काहीच चिंता नसल्याचे दिसून येत आहे.

1400 किलोमीटर रस्त्यांची खोदाई
शहराला 24 तास पाणीपुरवठा करण्यासाठी समान पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत शहराच्या विविध भागांत 1600 किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्या नव्याने टाकण्यात येणार आहेत. त्यासाठी किमान 1400 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची खोदाई करावी लागणार आहे. त्यामुळे नव्याने सिमेंट क्राँकिटीकरणाला मान्यता देण्यात येऊ नये, अशी मागणी सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेव वेलणकर यांनी महापालिका आयुक्तांकडे केली होती. आयुक्त कुणाल कुमार यांनीही 12 मीटर रुंदीपर्यंतच्या रस्त्यांची काँक्रिटीकरणाची कामे करता येणार नाहीत, असे आदेश काढले होते. त्यामुळे ही कामे सुज्ञ महापालिका आणि नगरसेवक थांबवतील, अशी शक्यता होती. मात्र, काँक्रिटीकरण करण्याचा नगरसेवकांचा अट्टाहास ठिकठिकाणी सुरूच असल्याचे दिसत आहे. ही एकप्रकारे नागरिकांच्या पैशाची उधळपट्टी असल्याने सुज्ञ पुणेकर संताप व्यक्त करत आहेत.

हे देखील वाचा

आकर्षक शोभायात्रांनी गुढीपाडवा सजला

ढोलताशांचा दणदणाट, लेझीमचं शिस्तबद्ध संचलन, पारंपारिक पोशाखात नटलेल्या मंडळींचा सहभाग घराघरांवर उभारल्या गुढ्या : वाहनांपासून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *