पुण्यात भाजप विरुद्ध काँग्रेस सरळ सामना

0

आता उत्सुकता उमेदवारीची

पुणे : लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्याने येत्या आठवडयात राजकीय घडामोडींना वेग येईल. त्यात उमेदवार कोण? याची उत्सुकता कार्यकर्त्यांना राहाणार आहे. वंचित आघाडी, आम आदमी पार्टी आदी पक्ष रिंगणात असले तरी खरी लढत भाजप आणि काँग्रेस पक्षातच होईल. काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीची घोषणा 13 तारखेला होईल असे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले. त्याच दरम्यान भाजपमध्येही उमेदवारांना कामाला लागा असा संदेश दिला जाईल.

काकडे, गायकवाड यांचा विचार

खासदार संजय काकडे आणि शेकापचे नेते प्रवीण गायकवाड यांच्या संभाव्य काँग्रेस प्रवेशामुळे काँग्रेसमधील राजकारण बदलून गेले आहे. माजी आमदार मोहन जोशी, अभय छाजेड आणि अरविंद शिंदे असे तीन पक्षातील उमेदवार निवडणूक रिंगणात असले तरी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी काकडे किंवा गायकवाड यांच्या नावाचा उमेदवारीसाठी गांभीर्याने विचार चालविला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गायकवाड यांच्यासाठी अनुकूल आहे तर काँग्रेस पक्षातील मध्यममार्गी नेते काकडे यांच्या बाजूने आहेत. त्यामुळे उमेदवारीचा अंतिम निर्णय काँग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधी घेतील असे सांगितले जाते. पुणे महापालिकेत भाजपमध्ये शंभर नगरसेवक आहेत. यापैकी चाळीस नगरसेवक काकडे यांचे नेतृत्व मानणारे आहेत.पालिका निवडणुकीपूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फोडाफोडी करून संजय काकडे यांनी अनेकांना भाजपमध्ये आणले होते. त्यातील चाळीसजण निवडून आले. पुढे काकडे आणि भाजपचे बिनसले. येत्या दोन दिवसात काकडे यांचा काँग्रेस प्रवेश होईल त्यावेळी किती नगरसेवक काकडे यांच्याबरोबर येतील ? याकडेही लक्ष आहे.भारतीय जनता पक्षात विद्यमान खासदार अनिल शिरोळे, पालकमंत्री गिरीश बापट आणि शहराध्यक्ष योगेश गोगावले हे उमेदवारीसाठी उत्सुक आहेत. त्यातही शिरोळे आणि बापट यांच्या नावाची चर्चा अधिक आहे. राजकीय वातावरण आणि सामाजिक स्थितीचा विचार करून भाजपचा उमेदवार ठरेल , असे विश्लेषकांचे मत आहे.