पुण्याहून परतलेल्या भुसावळातील वृद्धाचा मृत्यू

0

मृत्यूच्या नेमक्या कारणांचा वैद्यकीय यंत्रणेकडून शोध : तपासणी अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कळणार कारण

भुसावळ : पुण्याहून परतलेल्या 59 वर्षीय वृद्धाचा शुक्रवारी रात्री मृत्यू झाला. तत्पूर्वी अत्यवस्थ अवस्थेत रेल्वे रुग्णालयात त्यांना दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेनंतर या कुटुंबातील सदस्यांना शुक्रवारी रात्री जळगाव सामान्य रुग्णालयात तपासणीसाठी हलवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. या वृद्धाचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची दाट शक्यता असलीतरी वैद्यकीय पथकाला मृत्यू अहवालाची प्रतीक्षा असून त्यानंतर स्पष्ट काही सांगता येईल, असे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.

हृदयविकाराने मृत्यूचा दाट संशय
सूत्रांच्या माहितीनुसार, शहरातील एका भागातील दाम्पत्य पर्यटनासाठी ऑस्ट्रेलियाला गेले व ते पुण्यात परतल्यानंतर दहा दिवस तेथे राहून भुसावळात 21 रोजी परतले होते. त्यातच शुक्रवारी रात्री 59 वर्षीय वृद्धाला हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचा मृत्यू ओढवला. दरम्यान, हे दाम्पत्य ऑस्ट्रेलियाला गेले अथवा नाही? याची ठोस माहिती प्रशासनाकडे नसलीतरी हे दाम्पत्य पुण्याहून परतल्याचे सांगण्यात आले. रेल्वेच्या एका विभागातून निवृत्ती घेतलेल्या या वृद्धास डायबीटीस, हायपर टेंशन आदी आजार असल्याची माहिती आहे. मृत व्यक्तीचा मृत्यूचा नेमका अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके स्पष्ट कारण कळणार आहे.

विनाकारण रस्त्यावर फिरणे टाळा
भुसावळकरांनी विनाकारण रस्त्यांवर न फिरण्याचे आवाहन पोलिस दलाने केले आहे. नागरीकांनी घरात थांबावे व अत्यावश्यक गरजेच्या वेळीच बाहेर पडावे, असे आवाहन पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड यांनी केले आहे.