पुर्नविवाह व्हॉट्सऍप ग्रुपने फुलविले दोन घटस्फोटीतांचे जीवन

0

चोपडा ( प्रतिनिधी): सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे सध्या माणसे एकमेकांपासून दुरावत आहेत. सोशल मीडियाच्या गैरवापरामुळे समाजात समाजात अंधश्रद्धा, जातीयता, भेद, अश्लीलता पसरवली जात आहे असा आरोप होतो. पण याच सोशल मीडियाच्या चांगल्या वापरामुळे समाजसेवा करण्याचा अनोखा उपक्रम चोपडा तालुक्यात घडला असुन दोन घटस्फोटीत एकमेकांचा आधार झाले आहेत.
जिल्हा परिषदेचे सेवानिवृत्त वरिष्ठ सहाय्यक बी.एन. पाटील जानवेकर(ह.मु.चोपडा) यांनी सेवानिवृत्ती नंतरचे जीवन समाजसेवेसाठी वाहून घेण्याचे ठरविले. सेवानिवृत्तीनंतर आपल्या दांडग्या जनसंपर्काचा फायदा समाजातील गरजूंना व्हावा या उद्देशाने त्यांनी व्हॉट्सऍप वर पुनर्विवाह व्हाट्सप ग्रुप, घटस्फोटीत व्हॉट्सप ग्रुप, खान्देशी विवाहोत्सुक व्हॉट्स अप ग्रुप आदी बनवून समाजातील गरजू ,विवाहोत्सुक व घटस्फोटीत तरुण-तरुणींना पुन्हा एकत्र आणून त्यांच्या एकाकी जीवनाला जीवनसाथी मिळवून देऊन पुन्हा बहरवण्याचे कार्य सुरू केले. या कार्याचाच एक भाग म्हणून नुकतेच जळगाव येथील किरण संतोष पाटील व कल्याण येथील शुभांगी शिंदे यांचा पुनर्विवाह या व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून पाटील यांनी घडवून आणला. किरण पाटील यांना दोन मुली त्या उच्च शिक्षण घेत आहेत व त्यांच्या पत्नी पाच वर्षांपूर्वी स्वर्गवासी झाल्या आहेत. त्या मुलींना आई मिळवून देण्यासाठी तसेच किरण व शुभांगी यांच्या जीवनात परस्परांना आधारस्तंभ मिळवून देण्यासाठी या व्हाट्सप ग्रुपच्या माध्यमातून पाटील यांनी पुढाकार घेतला. दोन्हीकडच्या कुटुंबीयांना समजावले. एकत्र आणले. समुपदेशन केले. आणि याचाच परिपाक म्हणून या दोघांचा विवाह नुकताच एरंडोल तालुक्यातील पद्मालय या ठिकाणी गणपती मंदिरात साध्या पद्धतीने पार पडला.