पुलवामा हल्ला वर्षपूर्ण: मोदींसह अनेकांनी वाहिली श्रद्धांजली; राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न !

0

नवी दिल्ली: पुलवामा येथे गेल्या वर्षी आजच्याच दिवशी १४ फेब्रुवारीला सीआरपीएफच्या ताफ्यावर भ्याड हल्ला झाला होता. या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाले. या दहशतवादी हल्ल्याला आज एक वर्ष पूर्ण झाले असून देशात काळा दिवस पाळला जातो आहे. शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह दिग्गजांनी श्रद्धांजली वाहिली आहे. गृह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, कॉंग्रेस नेते राहुल गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह दिग्गजांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून श्रद्धांजली वाहिली आहे.

‘पुलवामा हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली. त्यांनी आपले जीवन आपल्या देशाच्या सेवेसाठी आणि संरक्षणासाठी वाहिले. पुलवामा हल्ल्यातील जवानांचे बलिदान देश कधीच विसरणारही नाही’ असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.

राहुल गांधी यांनी श्रद्धांजली अर्पण करताना काही प्रश्न उपस्थित केले आहे. पुलवामा हल्ल्याचा सर्वाधिक फायदा कोणाला झाला ?, भाजप सरकारमधील कोण या हल्ल्याला जबाबदार आहे असे प्रश्न राहुल गांधींनी उपस्थित केले आहे. राहुल गांधी यांच्यावर यावरून टीका होत आहे. पुलवामा हल्ल्याला वर्ष पूर्ण झाल्यानंतरही राहुल गांधी यावरून राजकारण करत असल्याने त्यांच्यावर टीका होऊ लागली आहे.