पेपर देवून परतणारा बारावीचा विद्यार्थी ठार

0

ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकी चक्काचूर ः कुसुंबा येथील हॉटेल निलांबरी समोरील अपघाताची घटना


जळगाव: कंपनी कामागाराचा खोटेनगर स्टॉपजवळ डंपरच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली होती. ही ताजी असतांना शनिवारी कुसूंबा येथून बारावीचा हिंदी विषयाचा पेपर देवून दुचाकीने मित्रासमवेत घराकडे परणार्‍या विद्यार्थ्याला समोरुन येणार्‍या विनानंबरच्या ट्रॅक्टरने धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सव्वा दोन वाजेच्या सुमारास घडली. अदनान असद खान वय 17 रा. अक्सानगर असे मयत विद्यार्थ्याचे नाव असून दुचाकीवर पाठीमागे बसलेला शेख मोहम्मंद शेख अब्दुल रहेमान कुरेशी वय 17 रा. तांबापुरा हा बालंबाल बचावला असून जखमी झाला आहे. अपघात इतका जोरदार होता की, अपघातात दुचाकीचा चक्काचूर झाला होता. अपघातानंतर ट्रॅक्टरसह चालकास एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मिल्लत ज्यूनिअर कॉलेजचे विद्यार्थी

या संदर्भात अधिक असे की, सर्वत्र बारावीची परिक्षा सुरु आहे. शहरातील मिल्लत ज्यूनिअर कॉलेजचे विद्यार्थी अदनान असद खान (वय 17, रा. अक्सानगर) व शेख मोहंमद शेख अब्दुल रहेमान कुरेशी (वय 17, रा. तांबापुरा) हे शनिवारी 11 ते 2 या वेळेत कुसुंबा येथील स्वामी समर्थ विद्यालय केंद्रावर बारावीचा हिंदीचा पेपर होता.अ पेपर देण्यासाठी अदनान हा त्याच्या नातेवाईकाची दुचाकी (क्र. एमएच 19 एमव्ही 3055) घेवून गेला होता. त्याच्यासोबत त्याचा मित्र शेख अब्दुल कुरेशी होता. पेपर झाल्यानंतर दोघेही याच दुचाकीने घराकडे परतत होते. यादरम्यान दुपारी सव्वा दोन वाजेच्या सुमारास कुसूंबा येथील हॉटेल निलांबरी जवळ समोरून येणार्‍या विनानंतरबच्या ट्रॅक्टरने दुचाकीला धडक दिली. या जोरदार अपघातात दुचाकी स्वार अदनान खान हा जागीच ठार झाला.

इतर विद्यार्थ्यांनी हलविले सिव्हीलमध्ये

अपघातानंतर घटनास्थळी एकच गर्दी जमली होती. अपघाताची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. तोपर्यंत मागून पेपर देवून परतणार्‍या इतर विद्यार्थ्यांनी ओळख पटवून दोघांना तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविले. यात अदनान यास वैद्यकीय अधिकार्‍यांनी मृत घोषित केले. तर दुचाकीच्या मागे बसलेला शेख मोहम्मद हा गंभीर जखमी झाला असून त्याच्या पायाला मोठी दुखापत झाली आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, या अपघातात ट्रॅक्टर चालक देखील जखमी झाला असून विना नंबरच्या ट्रॅक्टर-ट्रॉलीसह एमआयडीसी पोलीसांनी चालकाला ताब्यात घेतले आहे.

एकुलत्या एक मुलाचा मृत्यू

मयत अदनान हा एकुलता एक मुलगा होता. त्याचे वडील असद खान हे रिक्षा चालक आहे. ते सामाजिक कार्यकर्ते असून त्यांनी अदनानच्या नावाने अदनान फाऊंडेशन स्थापन केली आहे. फाऊंडेशनच्या माध्यमातून ते सामाजिक कार्यक्रम घेत असतात. अदनान यांच्या मृत्यूने अदनान यांच्यावर दुखाःचा डोंगर कोसळला आहे. अपघाताची मिळताच अदनान याच्या शाळेतील मित्र, शिक्षकांसह नातेवाईक आणि मित्र मंडळींची जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात गर्दी जमली होती. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला.