पोलिसात तक्रारीनंतरही मुजोर ‘आरटीओ कार्यालया’कडून हप्तेखोरी सुरुच

0

ओव्हरलोड वाहनांबाबत गणेश ढेंगे यांनी केली तक्रार ; वाहन निरिक्षकांसह संबंधितांचे नोंदविले जबाब

जळगाव – ओव्हरलोड वाहनांवर कारवाई करण्याच्या बदल्यात ही कारवाई टाळण्यासाठी संबंधित वाहनमालकांकडून ठरलेली रक्कम उपप्रादेशिक परिवहन कार्यालय खाजगी व्यक्तीच्या माध्यमातून हप्त्यांच्या स्वरुपात बिनधास्तपणे वसुल करत आहे. विशेष म्हणजे या गैरव्यवहाराबाबत जिल्हाधिकारी, परिवहन आयुक्त, पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार झाली. या तक्रारीची दखल घेवून पोलीस अधीक्षकांतर्फे संबंधित उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे मोटार वाहन निरिक्षक, कंत्राटी वाहन चालक यांची रामानंदनगर पोलीस स्टेशनतर्फे चौकशी सुरु असून जाबजबाब नोंदविण्यात आले आहे, मात्र या चौकशीदरम्यानही मुजोर उपपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून ओव्हरलोड वाहनांच्या बदल्यातील हप्तखोरीच सुरुच असून कुठलीही कारवाई करण्यात आली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

काय होती तक्रार
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या वायुवेग पथकातील मोटार वाहन निरिक्षक, सहाय्यक मोटार वाहन निरिक्षक खाजगी व्यक्तीमार्फत ओव्हरलोड वाहनांच्या प्रकारानुसार पैसे घेवून कारवाई न करता वाहन सोडत आहेत. संबंधितांसह मोटार वाहन निरिक्षक यांचे खाजगी व्यक्ती यांचे मोबाईलचे संदेश व संभाषणाीच तपासणी होवून कारवाई व्हावी, या आशयाची तक्रार गणेश कौतिकराव ढेंगे यांनी 31 ऑगस्ट 2019 रोजी एकाचवेळी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक तसेच परिवहन आयुक्त यांच्याकडे केली होती. तक्रारीत हप्तेखोरीत सहभागी संबंधितांचे मोबाईल क्रमांक तसेच नावे सुध्दा देण्यात आली असून वाहनांच्या प्रकारानुसार कशा पध्दतीने ओव्हरलोड वाहनमालंकाडून किती रक्कम हप्त्यांच्या स्वरुपात दर महिन्याला स्विकारली जाते हे सुध्दा नमुद करण्यात आले होते.

माहिती अधिकाराच्या अर्जानंतर कार्यवाही
तक्रार अर्ज करुनही त्यावर पोलीस प्रशासनाकडून कुठलीही कार्यवाही होत नसल्याने तसेच विलंब होत असल्याने ढेंगे यांनी कारवाईबाबत माहिती अधिकारात अर्ज सादर करुन माहिती मागविली होती. या माहिती अधिकाराच्या अर्जानंतर पोलीस यंत्रणा हलली. यानंतर डॉ. पंजाबराव उगले यांनी रामानंदनगर पोलीस स्टेशनला तक्रारीनुसार चौकशीचे आदेश दिले. त्यानुसार रामानंदनगर पोलीस स्टेशनतर्फे चौकशी सुरु असून माझ्यासह अर्जानुसार संबंधित मोटार वाहन निरिक्षकांसह इतरांचे जबाब पोलिसांनी नोंदविले असल्याची माहिती ढेंगे यांनी बोलतांना दिली आहे. एकीकडे वाहतूक नियमांची अंमलबजावणी न करणार्‍या मंत्र्याच्या वाहनावरही तत्काळ कारवाई करण्यात येते दुसरीकडे अर्ज, पुरावे देवून उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील संबंधितांवर कारवाई होण्यास आवश्यक चौकशी करण्यासही विलंब झाल्याबद्दल त्यांनी खंतही व्यक्त केली.

जिल्ह्याबाहेरील ओव्हरलोड वाहनांबाबत येतो फॅक्स
ढेंगे यांनी तक्रारीत संबंधित मोटार वाहन निरिक्षक यांचे कंत्राटी वाहन चालक यांचे मोबाईलचे संदेश, संभाषणाची तपासणी करावी असे म्हटले आहे. तसेच शहरातील एका झेरॉक्स दुकानात बाहेर जिल्ह्यातून येणार्‍या ओव्हरलोड वाहनांच्या क्रमांकाचा फॅक्स येतो. वायु वेग पथकातील मोटार वाहन निरिक्षकांचा खाजगी व्यक्ती फॅक्स आलेली वाहनांची यादी स्विकारत असतो. गिरणा टाकी रस्त्यावरील सुविधा झेरॉक्स या दुकानावर हा प्रकार सुरु असल्याचेही ढेंगे यांनी सांगितले.