पोलिसात तक्रार दिली म्हणून तरुणावर कोयत्याने वार !

0

पिंपरी-पोलिसात तक्रार दिल्याच्या रागातून चारजणांच्या टोळक्यांनी एका तरुणावर कोयत्याने वार केले. तसेच त्याच्या मित्रालाही मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना  चिंचवड येथील मोरया हौसिंग सोसायटीत घडली.

शुभम किसन थोरात (वय २०, रा. बिल्डींग नं.५, रुम नं.४०३, मोरया हौसिंग सोसायटी, चिंचवड) असे कोयत्याचे वार होऊन जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, रफिक शेख उर्फ काळ्या, महादेव कांबळे, महेश पाटोळे आणि एका अनोळखी इसम (सर्व. रा. वेताळनगर चौक, चिंचवड) या चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास शुभम आणि त्याचा मित्र अक्षय ढोबळे हे मोरया हौसिंग सोसायटीच्या पार्किंगमध्ये गप्पा मारत बसले होते. यावेळी आरोपी रफिक, महादेव, महेश आणि एका अनोळखी इसम त्यांच्या जवळ आला आणि “आमच्या विरोधात पोलीसात तक्रार देतो”, असे बोलून मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच रफिक याने शुभमच्या डोक्यात कोयत्याने वार करुन जीवे मारण्याची धमकी दिली. आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेले नाही. सहायक पोलीस निरीक्षक जाधव तपास करत आहेत.