प्रजासत्ताक दिनी डोनाल्ड ट्रम्प उपस्थित राहण्याची शक्यता धूसर?

0

नवी दिल्ली: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रजासत्ताक दिनी (२६ जानेवारी)च्या सोहळ्याला उपस्थित राहण्याची शक्यता कमी आहे. अमेरिकेतील काही राजकीय कार्यक्रम आणि संसदेतील भाषणामुळे ट्रम्प प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला येणार नाहीत, अशी शक्यता आहे. तसे संकेत अमेरिकेकडून मोदी सरकारला देण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचे आमंत्रण सरकारकडून डोनाल्ड ट्रम्प यांना देण्यात आले आहे. मात्र अमेरिकेच्या संसदेत भाषण करायचे असल्याने ट्रम्प नोव्हेंबरपासून अतिशय व्यस्त असणार आहेत. या भाषणातून ट्रम्प पुढील वर्षासाठी आखण्यात आलेला रूपरेषा संसदेसमोर ठेवतील. याशिवाय सरकारच्या कामगिरीचीदेखील माहिती देतील. त्यामुळे ट्रम्प यांचं भाषण पुढील राजकारणाच्या दृष्टीनं महत्त्वाचं असेल. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांची प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला उपस्थित राहण्याची शक्यता कमीच आहे. मात्र 2015 मध्ये संसदेत भाषण द्यायचे असूनही तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला उपस्थित राहिले होते.

जानेवारीत ट्रम्प यांचे काही आंतरराष्ट्रीय कार्यक्रम आहेत. मात्र याआधी मोदी आणि ट्रम्प अर्जेंटिनातील जी-20 परिषदेत भेटतील. अर्जेंटिनाची राजधानी ब्युनॉस आयरिसमध्ये 30 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबरला जी-20 परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. दक्षिण अमेरिकेत होणारी ही पहिलीच जी-20 परिषद असेल. या परिषदेत मोदी आणि ट्रम्प यांच्यात होणारी चर्चा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. मोदींनी त्यांच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान ट्रम्प यांना भारत भेटीचे निमंत्रण दिले होते. 2016 मध्ये फ्रान्सचे अध्यक्ष ओलांद प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. तर 2017 मध्ये अबूधाबीचे राजे सोहळ्याला उपस्थित होते.