प्रत्येक घटकापर्यंत विकास पोहचविण्याचा प्रयत्न : रामदास आठवले

0

पुणे : भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी समतेची भूमिका मांडली. आपल्या हक्कासाठी संघर्ष करण्याचा संदेश दिला. त्याच मार्गावर वाटचाल करताना समाजातील प्रत्येक घटकापर्यंत विकास पोहचविण्याचा शासनाचा प्रयत्न आहे, असे केंद्रीय सामाजिक न्याय आणि विकास राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले. सामाजिक क्षेत्रात सुधारणावादी कार्य करून सामाजिक न्याय क्षेत्रात राज्याचे नाव राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर नेल्याबद्दल मुक्तांगण मित्र या संस्थेस शाहू, फुले, आंबेडकर पारितोषिक देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले. या पुरस्कार प्रदान सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागातर्फे हा पुरस्कार देण्यात येतो. 7 लाख 50 हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह असे या पारितोषिकाचे स्वरूप आहे. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्यमंत्री राजकुमार बडोले, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य राज्यमंत्री दिलीप कांबळे यावेळी उपस्थित होते. मुक्तांगण मित्रच्या प्रमुख मुक्ता पुणतांबेकर आणि माधव कोल्हटकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला.