फुकट्या प्रवाशांकडून 14 कोटींचा दंड वसूल

0

पुणे : मध्य रेल्वेकडून पुणे-मळवली, पुणे-बारामती, पुणे-मिरज या टप्प्यांसह कोल्हापूर विभागामध्ये तिकीट तपासणी करण्यात आली. एप्रिल 2018 ते फेब्रुवारी 2019 या कालावधीमध्ये तिकीट तपासणीमध्ये 3 लाख 4 हजार घटनांमध्ये 14 कोटी 70 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. यावर्षी प्रवासादरम्यान 1 लाख 38 हजार प्रवासी विनातिकीट आढळून आले. त्यांच्याकडून 7 कोटी 48 लाख रुपये दंड वसूल केला होता. गेल्यावर्षी 2 लाख 61 हजार घटनांमध्ये 13 कोटी 56 लाख रुपये वसूल केला होता. रेल्वे प्रशासनाकडून अशा प्रकारची तिकीट तपासणी नियमीत केली जाते. ही कारवाई मंडल रेल्वे प्रबंधक मिलिंद देऊस्कर आणि अप्पर मंडल रेल्वे प्रबंधक प्रफुल्ल चंद्रा यांच्या मार्गदर्शनाखाली तर मंडल वाणिज्य प्रबंधक सुनील मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली तिकीट तपासनीस आणि रेल्वे सुरक्षा दलाने केली. प्रवाशांनी रेल्वे नियमांनुसार योग्य तिकीट घेऊनच प्रवास करावा. तसे न केल्यास कमीत कमी 250 रुपये दंड आकारण्यात येणार आहे. त्याचबरोबर प्रवासादरम्यान श्रेणीप्रमाणे निश्चित केलेल्या वजनापेक्षा जास्त वजनाचे सामान नेल्यास सहा पट दंड भरावा लागेल. आरक्षण नक्की नसलेल्या गाडीने प्रवास केल्यास मूळ भाडे आणि तेवढाच दंड आकारण्यात येईल. दंड न भरल्यास प्रवाशांना कारावास होऊ शकतो, यासाठी प्रवाशांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.