फुकट्या प्रवाशांविरुद्धच्या कारवाईत २ कोटींची वसुली

0 1

पुणे:- एप्रिल 2018 या एका महिन्यात पुणे रेल्वे प्रशासन मंडळाच्यावतीने फुकट्या प्रवाशांविरुद्ध राबविण्यात आलेल्या मोहिमेमध्ये 36 हजार 269 जणांवर कारवाई करण्यात आली. या मोहिमेमध्ये एका महिन्यात 2 कोटी 4 लाख 4 हजार एवढा दंड वसूल करण्यात आला असून यात 15 हजार 727 विनातिकीट प्रवास करणाऱ्यांचादेखील समावेश आहे.

या मार्गावर राबविण्यात आली मोहीम
ही मोहीम पुणे-मळवली, पुणे-बारामती, पुणे-मिरज आणि मिरज-कोल्हापूर या दरम्यान करण्यात आली. पुणे रेल्वे मंडळाचे व्यवस्थापक मिलिंद देऊस्कर व अतिरीक्त मंडळ रेल्वे व्यवस्थापक प्रफुल्ल चंद्रा यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. यापुढील काळात विनातिकीट प्रवास करणाऱ्यारा प्रवाशांवर कारवाई करुन वेळप्रसंगी त्यांना कारावास भोगावा लागू शकतो, असेही प्रशासनाच्या वतीने सूचित करण्यात आले आहे.

फुकट प्रवास करणाऱ्यांमुळे रेल्वेला तोटा
रेल्वेमधून फुकट प्रवास करणे किंवा प्लॅटफॉर्म तिकीट न घेता फिरणे, सेकंड क्‍लासचे तिकीट काढून फर्स्ट क्‍लासच्या डब्यातून प्रवास करणे, अशा विविध कारणांसाठी रेल्वे प्रशासानकडून प्रवाशांवर कारवाई केली जाते. विनातिकीट प्रवास करणाऱ्या 15 हजार 727 जणांकडून 1 कोटी 06 लाख 17 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसात रेल्वेने फुकट प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत असल्याने रेल्वेचा महसूल बुडून पर्यायाने रेल्वेला तोटा सहन करावा लागतो. यामुळे अशा फुकट्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश प्रशासनातील वरिष्ठांनी दिले.