फेरीवाल्यांचे सर्वेक्षण लवकरच होणार सुरू

0

मुख्याधिकार्‍यांनी बैठकीत दिली माहिती

तळेगाव दाभाडे : दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत तळेगाव दाभाडे शहर फेरीवाला समितीच्या बैठकित फेरीवाला समितीचे अध्यक्ष तथा मुख्याधिकारी वैभव आवारे यांनी येत्या आठ दिवसात तळेगाव शहरातील सर्व प्रकारच्या फेरीवाल्यांचे सर्वेक्षण सुरु करण्यात येणार आहे असे सांगितले. तळेगाव दाभाडे शहरात फेरीवाल्यांना सहाय्य करण्यासाठी राष्ट्रीय फेरीवाला धोरण 2009 प्रमाणे स्थापित झालेल्या फेरीवाला समितीची बैठक नगरपरिषदेच्या सभागृहामध्ये पार पडली. यावेळी राज्य उपसंचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय यांच्या परिपत्रकानुसार नागरी पथविक्रेत्यांना सहाय्य घटकांमध्ये तळेगाव दाभाडे नगरपरिषदेने पाठवलेल्या प्रस्तावास राज्य अंतरिम मान्यता समितीने मंजुरी दिली असून येत्या आठ दिवसात तळेगाव शहरातील सर्व प्रकारच्या फेरीवाल्यांचे सर्वेक्षण सुरु करण्यात येणार आहे.

सर्वेंक्षणासाठी फेरीवाल्यांनी सहकार्य करावे
हे सर्वेक्षण मोबाईल अ‍ॅप आधारित जीआयएस प्रणाली बायो-मेट्रिकथमद्वारे सिद्धांत समाज विकास संस्था या बाह्य यंत्रणेमार्फत सर्वेक्षण होणार असून फेरीवाल्यांनी सहकार्य करावे. फेरीवाला समितीने आपआपल्या विभागात याविषयी प्रचार-प्रसिद्धी करावी, असे आवाहन मुख्याधिकारी यांनी केले. बैठकीत फेरीवाला समिती सदस्य महेश महाजन यांनी फेरीवाला समितीवर 40 टक्के फेरीवाल्यांचे प्रतिनिधी असल्याबद्दल सर्व फेरीवाला प्रतिनिधी सदस्यांचे अभिनंदन केले व आता आपली शहराच्या विकासात सुव्यवस्था आणि समृद्धीसाठी महत्वाचे योगदान द्यायचे आहे. या बैठकीस पोलीस निरीक्षक नारायण व्ही.पवार, वाहतूक पोलीस उपनिरीक्षक एस.एन. हगवणे, सहाय्यक नगर रचनाकार शरद पाटील, व्यावसायिक प्रतिनिधी महेश महाजन, रत्नकांत चिखले, अभय येळवंडे, किरण साळवे, रंजना राठोड, संगीता गव्हाणे, अरविंद गायकवाड, सोपान राक्षे, अपर्णा पाटील आदी सदस्य उपस्थित होते.