फेसबुक इंडियाचे मार्केटिंग प्रमुखपदी अविनाश पंतची निवड !

0

मुंबई: सोशल मीडियात सर्वाधिक प्रभावी माध्यम म्हणजे फेसबुक. शिक्षित, अशिक्षित सगळेच फेसबुकचे वापरकर्ते आहेत. वापरकर्त्यांसाठी फेसबुक नवनवीन फिचर आणत आहे. आता फेसबुकने भारतात मार्केटिंगवर अधिक भर देत आहे. कंपनीने अविनाश पंत यांची फेसबुक इंडियाचे मार्केटिंग प्रमुख (विपणन संचालक) म्हणून नियुक्ती केली आहे. आज शुक्रवारी २४ रोजी याबाबत कंपनीकडून माहिती देण्यात आली आहे.

अविनाश पंत यांची विपणन संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विपणन संचालक हे नवे पद असेल आणि फेसबुक, इंस्टाग्राम व व्हॉट्सअॅपसह फेसबुकच्या मालकिच्या सर्व अॅप्सवरील मार्केटिंगच्या प्रयत्नांवर देखरेख ठेवण्याची मुख्य जबाबदारी त्यांच्यावर असेल. पंत यांच्याकडे २२ वर्षांचा अनुभव असल्याची माहिती फेसबुकने दिली. पंत यांच्याकडे यापूर्वी नाइकी, कोकाकोला, दी वॉल्ट डिज्नी कंपनी आणि रेडबुल यांसारख्या कंपन्यांसोबत काम करण्याचा मोठा अनुभव आहे.

रेडबुलचे भारतातील मार्केटिंग प्रमुख म्हणून त्यांनी अखेरची जबाबदारी सांभाळली होती. ब्रँड म्हणून रेडबुलची ओळख निर्माण करण्याची त्यांच्यावर मुख्य जबाबदारी होती. आयआयएम अहमदाबाद येथून उत्तीर्ण झालेले पंत हे फेसबुकचे व्यवस्थापकीय संचालक आणि उपाध्यक्ष अजित मोहन यांना कामासंबंधीचा अहवाल सादर करतील.