फैजपूरच्या खंडेराव संस्थांचे महंत घनश्याम दासजी यांचे निधन

0

महावीरदासजी यांनी दिला अग्निडाग : महिलांचीही होती उपस्थिती

फैजपूर- प्रसिद्ध खंडोबा देवस्थानचे प्रमुख तथा माजी उपनगराध्यक्ष ब्रह्मचारी महंत घनश्याम दासजी महाराज (90) यांचे रविवारी अल्पशा आजाराने पहाटे सहा वाजता निधन झाले. महंत घनश्यामदासजी महाराज प्रकृती अस्वस्थतेमुळे गेल्या सहा महिन्यापासून उपचार घेत होते. महंत गेल्या 30 वर्षांपासून पालिकेत नगरसेवक होते. त्यांनी उपनगराध्यक्षपद ही भूषविले होते. ते सलग सहा वेळा निवडून आले होते मात्र गेल्याच वर्षी झालेल्या पालिका निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता.

महाराजांच्या निधनाने भाविकांमध्ये हळहळ
घनश्यामदास महाराज हे संस्थानचे प्रमुख गादी पती होते व त्यांचे स्वतः चे एक वलय संपूर्ण परीसरात होते. त्यांनी नगरसेवक पद भूषवित असताना अनेक सहकारी संस्थांमध्येही काम केले होते. त्यांनी खंडोबा देवस्थान नावारुपाला आणून त्याठिकाणी सहा मंगल कार्यालय उभारून शहरवासीयांसाठी सोयी-सुविधा उपलब्ध करून देत लोकहिताचे कार्य केल. या देवस्थानची यात्रा संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. दरम्यान रविवारी सकाळी घनश्याम दासजी महाराज याच्या निधनाची वार्ता शहरात समजताच अनेकांनी देवस्थानाकडे धाव घेत त्यांचे अंतिम दर्शन घेतले.
दुपारी तीन वाजता सजविलेल्या ट्रॅक्टर वरून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. अत्ययात्रेवेळी भजनी मंडळ अग्रस्थानी होते.

अंत्ययात्रा मार्गावर पुष्पवृष्टी
देवस्थानापासून सुरू झालेल्या अंत्ययात्रा ही जुने म्युनीसीपल हायस्कूल, रथगल्ली, लक्कड पेठ, कासार गल्ली, सुभाष चौक,खुशाल भाऊ रोड,शहरातील राम मंदिर, मार्गाने जाऊन पुन्हा खंडोबा देवस्थान परीसरात आली. सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास अग्निडाग देण्यात आला. अंत्यसंस्कार झाल्यानंतर शोकसभेत महामंडलेश्वर जनार्दन महाराज, भरतदासजी महाराज, सद्गुरू रामस्नेहीदासजी आमदार हरीभाऊ जावळे, मसाका चेअरमन शरद महाजन, म.सा.का संचालक नरेंद्र नारखेडे, मधुस्नेह परीवाराचे अजित पाटील यांच्यासह साधू गण यांनी शोकसभेत महंत घनश्यामदासजी महाराज यांच्या आध्यत्मिक, सामाजिक, राजकीय व सहकार यांच्या कार्याबद्दलच्या योगदान बद्दल माहिती दिली. या शोकसभेचे सूत्रसंचालन किरण ओंकार चौधरी यांनी केले. दरम्यान, महंत घनश्याम दासजी महाराज यांच्या अंत्ययात्रा मार्गावर महिलांनी रस्त्यावर रांगोळ्या व पुष्पवृष्टी करून अंत्ययात्रेचे स्वागत केले.