फैजपूरच्या महिलेवर अत्याचार : आरोपी जाळ्यात

0

बोदवड न्यायालयाने तिघा आरोपींना सुनावली १३ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी : गुन्ह्यातील रिक्षा पोलिसांकडून जप्त

बोदवड: नातेवाईक असल्याचे सांगून फैजपूर येथील 20 महिलेला बोदवड येथे बोलूवन तिघा संशयीतांनी तिला लाल रंगाच्या विना क्रमांकाच्या मालवाहू अ‍ॅपे रीक्षातून नेत एका घरात अत्याचार करण्यात आल्याची घटना 2 डिसेंबर रोजी दुपारी घडली होती. घटनेची वाच्यता केल्यास ही घटना मोबाईलद्वारे उघड करण्याची धमकी संशयीतांनी महिलेला दिली होती. या प्रकरणी बोदवड पोलिस ठाण्यात शनिवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाल्यानंतर मंगळवारी या गुन्ह्यातील तिघा आरोपींच्या मुसक्या आवळण्यात बोदवड पोलिसांना यश आले. आरोपींना बोदवड न्यायालयात हजर केल्यानंतर न्या.एस.बी.गरड यांनी त्यांना 13 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

नातेवाईक असल्याचे सांगून फसवले

फैजपूर येथील 20 वर्षीय पीडितेला नातेवाईक असल्याचे सांगून तिन्ही संशयीतांनी बोदवड येथे 2 डिसेंबर रोजी बोलावले व एका मालवाहू रीक्षातून हिदायतन नगरातील एका ताडपत्रीच्या घरात नेऊन तिघांनी अत्याचार केला होता. या प्रकरणी संशयीत सद्दाम कुरेशी (रा.बोदवड) व त्याच्या दोन साथीदारांवर बोदवड पोलिसांत 7 डिसेंबर ररोजी गुन्हा दाखल झाला होता.

गोपनीय माहितीवरून आवळल्या मुसक्या

पोलिस निरीक्षक सुनील खरे, पोलिस उपनिरीक्षक भाईदास मालचे व गोपाळ गव्हाळे यांनी गोपनीय माहितीच्या आधारे संशयीत आरोपी सद्दाम जाममोहम्मद कुरेशी (26, कुरेशी मोहल्ला, बोदवड), शेख आबीद शेख बिस्मिल्ला कुरेशी (24, कुरेशी मोहल्ला, बोदवड) व शेख इम्रान ईस्माईल कुरेशी (24, सतरंजी मोहल्ला, बोदवड) यांना मंगळवारी अटक करण्यात आली. दरम्यान, आरोपींना मंगळवारी बोदवड न्यायालयात हजर केले असता न्या.एस.बी.गरड यांनी 13 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड.नवाब अहमद यांनी युक्तीवाद केला.