फैजपूर पालिकेची वेळेत कामे पूर्ण न करणारे दोन ठेकेदार ’ब्लॅक लिस्ट’मध्ये

0

फैजपूर पालिकेची कारवाई : विविध विकासकामांना मंजुरी

फैजपूर- फैजपूर नगरपरीषदेने दिलेली विकासकामे वारंवार नोटीसा व सूचना देऊन ही वेळेच्या आत न करणार्‍या तसेच नियमबाह्य व अंदाज पत्रकानुसार काम न करणार्‍या दोन ठेकेदाराना काळ्या यादीत टाकण्याची कारवाई फैजपूर पालिकेने केल्याने ठेकेदारांच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे 6 एप्रिलच्या सर्वसाधारण सभेत कारवाईचा ठराव करण्यात आला होता तर शुक्रवार, 11 रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत हा ठराव कायम करण्यात येऊन कारवाईवर सर्वानुमते शिक्कामोर्तब करण्यात आला

सभापतींची निवड ; विकासकामांना मान्यता
सभेत विविध विकासकामांना मान्यता देत शिक्षण ,मागासवर्गीय,व वृक्षारोपण समिती सभापतीची निवड करण्यात आली. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष महानंदा होले होत्या. मुख्याधिकारी सुवर्णा ओगले (शिंदे), उपनगराध्यक्ष कलीम खा मन्यार व नगरसेवक उपस्थित होते. फैजपूर पालिकेने दलित वस्ती योजनेंतर्गत मिल्लत नगर ते खिरोदापर्यंत गटारींचे बांधकाम ठेकेदार निखील भास्कर बोंडे यांना देण्यात आलेले होते तर दुसरे ठेकेदार सचिन प्रल्हाद भोंबे यांना वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत आठवडे बाजार सुशोभीकरण व बाजार ओट्याचे काम देण्यात आले होते. दोन वर्ष उलटून गेल्यावरही सदर ठेकेदारांनी पालिकेने दिलेली विकासकामे पूर्ण केलेली नव्हती जी कामे केली होती ती अर्धवट व निकृष्ट दर्जाची केलेली होती. ठेकेदार निखील बोंडे व सचिन भोंबे यांना पालिकेने कामे पूर्ण करण्यासाठी वेळोवेळी सूचना दिल्या होत्या तर वेळ प्रसंगी कारवाईच्या नोटीसा सुद्धा देण्यात आल्या होत्या तर कामे रखडल्याने नागरीकांचाही पालिकेवर रोष वाढत होता. याची दखल 16 एप्रिलच्या सर्वसाधारण सभेमध्ये घेतल्यानंतर ठेकेदारांना काळ्या यादीत समाविष्ट करण्याचा ठराव करण्यात आला तर शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत ठेकेदार सचिन भोंबे व निखील बोडे यांच्यावर कारवाईचा ठराव कायम करण्यात आला.दरम्यान, या कारवाईमुळे ठेकेदारांमध्ये खळबळ उडाली असून पालिकेची कामे वेळेत पूर्ण न करणार्‍या कारवाई होवू शकते, असे या ठरावातून दाखवून देण्यात आले आहे. दरम्यान याचं सभेत शहरातील विकासकामांच्या ठरवाना मंजुरी देण्यात आली आहे. आगामी पावसाळ्यानिमित्त नाला सफाईची कामे, रस्ता काँक्रिटीकरण, जंतूनाशके खरेदी कामांना मंजुरी देण्यात आली.

विषय समिती सभापतीची निवड
पालिकेच्या अधिनियमानुसार विषय समित्यांची व सभापती निवड शुक्रवारच्या सभेत करण्यात आली आहे. यात मागासवर्गीय कल्याण समिती सभापती प्रभाकर सपकाळे, शिक्षण समिती सभापतीपदी वत्सलाबाई कुंभार व वृक्षारोपण समिती सभापतीपदी पदसिद्ध नगराध्यक्ष महानंदा होले. याची सर्वानुमते निवड करण्यात आली.

माजी मंत्री खडसेंच्या अभिनंदनाचा ठराव
माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांना भोसरी जमीन खरेदी प्रकरणी क्लीनचिट मिळाल्याने त्यांचाही अभिनंदनाचा ठराव पालिकेच्या आजच्या सभेत करण्यात आला. या ठरावाची सूचना नगरसेवक हेमराज चौधरी सभागृहात मांडली होती तर या सूचनेला गटनेता मिलिंद वाघूळदे यांनी अनुमोदन दिले व सर्वानुमते खडसे यांच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला.

ठेकेदारांवर सर्वानुमते कारवाई -नगराध्यक्षा
मुख्याधिकारी यांनी मला संबंधित ठेकेदारासंदर्भात लेखी माहिती कळवली होती. ठेकेदार हे अंदाज पत्रकनुसार काम करीत नसून त्यांच्यावर कार्यवाही करण्यात, यावी अशी माहिती दिली होती. संबंधित ठेकेदाराची माहिती घेऊन त्यानुसार ठेकेदार यांना काळ्या यादीत टाकण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे. अश्या कुठल्याच ठेकेदारांची गय केली जाणार नाही, असे नगराध्यक्षा महानंदा टेकाम होले म्हणाल्या.