बकोरीतील शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित

0

वाघोली : आठ महिन्यांपूर्वी वादळी वार्‍यासह झालेल्या पावसामुळे हवेली तालुक्यातील बकोरी येथील शेतकर्‍याचे पॉलीहाऊस उडून गेल्यामुळे गुलाब फुलांचे मोठे नुकसान झाले होते. नुकसानग्रस्त भागाची संबंधित तलाठी, कृषी विभागाकडून पाहणी करून पंचनामा करण्यात आला होता. मात्र अद्यापही संबधित शेतकर्‍याला नुकसान भरपाई मिळाली नसल्यामुळे आर्थिक संकट उभे राहिले आहे. बकोरी येथील शेतकरी तिरसिंग सोनबा वारघडे यांनी कर्ज काढून डच जातीच्या गुलाब शेती सुरू केली. त्यासाठी त्यांनी पॉलिहाऊस उभारले. अतिशय कष्टाने सुरू केलेल्या गुलब व्यवसाय जोमात येताच निसर्गाच्या लहरीपणामुळे आठ महिन्यापूर्वी वादळी वार्‍यासह पाऊस झाला. त्यामध्ये पॉलिहाऊस उडून गेल्यामुळे गुलाबाचे मोठे नुकसान झाले. आधीच कर्जात बुडालेला शेतकरी आणि निसर्गाची अवकृपा यामुळे शेतकरी पूर्णतः खचला आहे. लाखो रुपयांची झालेली हानी भरून निघणे शक्य नसल्यामुळे वारघडे यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. नुकसानग्रस्त पॉलिहाऊस, गुलाब शेतीची तलाठी, कृषी अधिकारी, बँक अधिकारी यांनी पाहणी करून पंचनामा केला होता. त्यानंतर संबधित अधिकार्‍यांनी लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु आजपर्यंत भरपाई मिळाली नाही.