बारामती, पिंपरी चिंचवडप्रमाणे मावळचा विकास करणार

0 1

पार्थ पवार यांची ग्वाही

सगळ्यांनी कामाला लागा; पण, रात्री एक दिवसा एक वागू नका

पिंपरी चिंचवड : शरद पवार आणि अजितदादांनी जसा बारामतीसह पिंपरी चिंचवडचा विकास केला, त्याचप्रमाणे मावळ लोकसभा मतदारसंघाचा सर्वांगिण विकास करणार असल्याची ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार पार्थ पवार यांनी दिली. मावळ लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे अधिकृत उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचाराचा शुभारंभ रविवारी चिंचवड, वाल्हेकरवाडी येथील आहेर गार्डन येथे जाहीर मेळाव्यातून झाला.

यावेळी राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शेकापचे आमदार जयंत पाटील, शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, माजी आमदार विलास लांडे, आण्णा बनसोडे आदी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मला उमेदवारी दिली आहे. हे माझं पहिलं भाषण आहे. काही चुका झाल्या तर मला माफ करा. पक्षाने माझ्यावर उमेदवारी देऊन मोठी जबाबदारी दिली आहे. बारामतीचा विकास केला आहे. त्याच प्रमाणे पिंपरी चिंचवडसह मावळ लोकसभा मतदार संघाचा विकास करणार असल्याचा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. मावळचा चेहरामोहरा बदलणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

बाबांनो, मॅच फिक्सिंग करू नका…

राज्यातील आघाडीचे जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्यासाठी सगळ्यांनी कामाला लागा. पण, रात्री एक दिवसा एक वागायचं नाही. बाबांनो कोणीही मॅच फिक्सिंग करू नका, असे म्हणत पार्थ पवार यांचे प्रामाणिकपणे काम करण्याचे आवाहन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना केले आहे.

नोटाबंदीमुळे व्यावसायिकांचा धंदा उठला…

अजित पवार म्हणाले, देशात अच्छे दिनचा भ्रमनिरास झाला. चौकीदार चोर है, हे लोकांना पटू लागलं आहे. राफेलची कागदं चोरीला जातात. हाय कोर्टात धनगर समाजाच्या आरक्षणाची कागदे गहाळ झाल्याचे सांगितलं जात आहे. देशाच्या इतिहासात नव्हती एवढी बेकारी आज वाढली आहे. माणूस माणसात राहिला नाही. जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये तणाव निर्माण झाला आहे. नोटाबंदीमुळे व्यावसायिकांचा धंदा उठला आहे. नितीन गडकरी यांनी काम करू दिल जात नसल्याची कबुली दिली आहे. अशा अवस्थेत देशाचं काय होणार, म्हणून आघाडी सरकारला निवडायचे आहे. समविचारी लोकांना एकत्र आणून राज्यातील 48 जागा कशा निवडून आणता येतील, हे पाहावे लागेल.

भाजपने फक्त राजकीय पोळी भाजली…

पोटाची खळगी भरण्याची कामगार लोकं या शहरात आली. हिंजवडीत नोकरीच्या निमित्ताने तरुण शहरात आले. कामगारांच्या सहकार्याने पिंपरी-चिंचवडचा विकास करत असताना पक्षाचे स्थानिक पदाधिकार्‍यांनी खंबीर भूमिका घेतली. त्यामुळे मोठमोठे रस्ते झाले. विकास कामांचे पवार साहेबांनी भूमीपूजन केले. दहा वर्ष पालकमंत्री असताना करोडो रुपयांचा पैसा शहरात आणला. पिंपरी-चिंचवडमध्ये घरांची विक्री होत नाही. रिंगरोड, घरे, शास्ती करांचे प्रश्‍न सोडविण्याचे आश्‍वासने दिली. त्यातील स्वतःची राजकीय पोळी भाजपच्या लोकांनी भाजून घेतली.

पार्थच्या पाठिशी पूर्ण ताकद लावू ः जयंत पाटील

मागील निवडणुकीत थोडी चूक झाली, अशी कबुली देत आम्ही बोलतो ते करून दाखवतो. अजितदादा तुम्ही खाटाखाली लक्ष देवू नका. तिकडे आम्ही आहोत. हा शब्द देत पार्थ पवार यांच्या पाठिशी पुर्ण ताकद लावू, असा शब्द शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीला दिला आहे. शहरात गरिबांनी घरे बांधली ती नियमित झाली पाहिजेत. मुंबईत परप्रांतातल्या लोकांना भरपाई दिली जाते. पण, आम्हाची घरे अधिकृत केली जात नाहीत. उद्याचे राजकारण बदलत असून आमच्याकडून चुका झाल्या. तुमच्याकडून चुका झाल्या. पण, उद्याच्या निवडणुकीत सर्वाधिक जागा येतील आणि आघाडीचे सरकार येईल. नियोजनबध्द काम सुरू असल्याचेही ते म्हणाले.

चार वर्ष भाजप-सेनेने तमाशा लावला…

गेल्या चार वर्षात आम्ही काका हलवाई, चितळेंचे पेढे खाल्ले. अशा अनेक हलवाईंचे पेढे खायला मिळाले. परंतु, गोरगरिबांचं एकही घर सत्ताधार्‍यांनी अधिकृत केलं नाही. गेल्या पाच वर्षात एखाद्या जातीवंत तमासगीरांला लाजवेल, असा तमाशा राज्यातील शिवसेना-भाजपच्या नेत्यांनी करून दाखविला आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सचिन साठे यांनी युती सरकारचे वाभाडे काढले.