बारावीच्या नवीन पाठ्यपुस्तकांचा कृतींवर भर

0

अभ्यासगटात डॉ. जगदीश पाटील जिल्ह्यातून एकमेव : पीडीएफ पाठ्यपुस्तके उपलब्ध

भुसावळ : सध्या कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लर्न फ्रॉम होमनुसार ऑनलाईन शिक्षणावर भर देत असतानाच शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितल्यानुसार बालभारतीच्या वेबसाईटवर इयत्ता बारावीची नवीन पाठ्यपुस्तके पीडीएफ स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या पाठ्यपुस्तकांमधून कृतियुक्त अध्ययन, अनुभवसमृद्ध पाठांची रचना, व्यावसायीकता, सृजनशीलता, भाषिक कौशल्य यासह विविध विषयांवर भर देण्यात आल्याचे बालभारती मराठी भाषा अभ्यास गट सदस्य डॉ. जगदीश पाटील यांनी सांगितले.

वेबसाईटवर नव्यानेच बारावीची पाठ्यपुस्तके उपलब्ध
शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी इयत्ता 12 वी करीता नवीन पाठ्यपुस्तकांची निर्मिती महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ बालभारती पुणे यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे. या मंडळावर जळगाव जिल्ह्यातून डॉ. जगदीश पाटील हे मराठी विषयासाठी एकमेव अभ्यास गट सदस्य असून बारावी मराठी युवकभारती पाठ्यपुस्तक निर्मिती त्यांचा सक्रीय सहभाग आहे. त्यामुळे पाठ्यपुस्तकाच्या आतील पहिल्या पानावरील अभ्यास गट सदस्यांमध्ये त्यांचे नाव आहे. त्यांनी आठवी व दहावीसाठी सुद्धा काम केले आहे. बालभारतीच्या वेबसाईटवर नव्यानेच बारावीची पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या पाठ्यपुस्तकांमध्ये अध्ययन सुलभ होण्यासाठी रंजक व कृतियुक्त स्वाध्याय, अनुभवसमृद्ध पाठांची रचना, सृजनशीलता, भाषिक कौशल्य, व्यावसायिक संधी, स्वमत, अभिव्यक्ती, उपयोजन, साहित्याचा आस्वाद यासह विविध विषयांवर भर देण्यात आला आहे. तसेच पाठ्यपुस्तकांचे अंतरंग व बाह्यरंग विविधांगी रंगांनी सजविण्यात आले असून सुसंगत चित्रांमुळे पाठ्यपुस्तक अधिक आकर्षक झाले आहे. इयत्ता बारावीसाठी कला, वाणिज्य, विज्ञान व किमान कौशल्य विभागाकरिता एकूण 41 पाठ्यपुस्तकांची निर्मिती बालभारतीने गेल्या वर्षभरात केली आहे. हे सर्व पाठ्यपुस्तके पीडीएफ उपलब्ध असून विद्यार्थ्यांना लर्न फ्रॉम होम करता येणार आहे.

मराठीचा व्यावसायिकतेवर भर
मराठी युवकभारती पाठ्यपुस्तकात 12 पाठ व कविता असून कथा साहित्यप्रकाराचा परिचय करून देण्यात आला आहे. तसेच व्यावसायिक दृष्टिकोनातून उपयोजित मराठीद्वारे मुलाखत, माहितीपत्रक, अहवाल व वृत्तलेख यांची ओळख करून दिलेली आहे.

अभ्यासक्रम पुनर्रचनेचा टप्पा पूर्ण
नवीन पुनर्रचित अभ्यासक्रमाला अनुसरून इयत्ता पहिली ते बारावी पाठ्यपुस्तकांच्या निर्मितीचे काम बालभारतीने पूर्ण केले आहे. दरवर्षी दोन इयत्तांची पाठ्यपुस्तके यानुसार गेल्या सहा वर्षात हा टप्पा पूर्ण करण्यात आला आहे.