बारावी परीक्षार्थींच्या नुकसानीला मुख्यमंत्र्यांसह भाजपा सरकार जबाबदार

0

राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष रवींद्र पाटील ; इंग्रजी पेपराला विद्यार्थ्यांना मनस्ताप

भुसावळ- आरपीडी रोडवरील डी.एस.हायस्कूलच्या मैदानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची सभा सुरू असताना गुरुवारी डी.एस.हायस्कूलमध्ये बारावीची परीक्षा सुरू होती तर लाऊड स्पीकरमुळेविद्यार्थ्यांना पेपर लिहिताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला त्यामुळे विद्यार्थ्यांचे काही शैक्षणिक नुकसान झाल्यास त्यास मुख्यमंत्री व भाजपा सरकार जबाबदार राहतील, असा इशारा राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष तथा जिल्हा परिषद शिक्षण समिती सदस्य रवींद्र नाना पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.

तीन तास विद्यार्थ्यांना मनस्ताप
बारावी परीक्षेचे केंद्र डी.एस.हायस्कूल असून पहिल्याच दिवशी गुरुवारी बारावी इंग्रजीचा पेपर सकाळी 11 वाजता सुरू असतानाच मैदानावरील साऊंडचा व गाण्यांच्या आवाजामुळे विद्यार्थ्यांना होत असलेल्या मनस्तापामुळे केंद्रप्रमुख व शाळेतील शिक्षकांनी आवाज कमी करण्याची विनंती केल्यानंतर काही काळ आवाज बंद झाला परंतु काही वेळात तो पुन्हा वाढला. दीड वाजेच्या सुमारास मुख्यमंत्र्यांचे मैदानावर आगमन झाल्यानंतर आवाजामुळे विद्यार्थ्यांना पेपर सोडवताना मोठा मनस्ताप सोसावा लागला.

सभास्थळ का बदलले नाही?
भुसावळ शहरात सभा घेण्याचे नियोजन झाल्यावर डी.एस.हायस्कूलचे मैदान सोडून शहरात इतर ठिकाणीदेखील या सभेचे नियोजन करता आले असते या सभेमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती रवींद्र पाटील यांनी व्यक्त केली आहे.