बालगंधर्वच्या पुनर्विकासासाठी 8 प्रस्तावाची निवड

0

पुणे : बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासासाठी आलेल्या 26 प्रस्तावांमधील 8 प्रस्तावांची अंतीम निवड करण्यात आली आहे. बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्वसनासाठी महापौरांच्या अध्यक्षतेखाली 21 सदस्यांच्या समितीसह महापालिका प्रशासनाच्या सात सदस्यांची नियुक्ती करण्यात आली होती. या समितीने आचारसंहितेपूर्वी 5 ते 7 मार्च या तीन दिवसांत सर्व प्रस्तावांचे सादरीकरण तसेच माहिती घेऊन हे 8 प्रस्ताव अंतीम केले आहेत.

26 प्रस्ताव प्राप्त

बालगंधर्व रंगमंदिरांच्या पुनर्विकासासाठी प्रशासनाने नोंदणीकृत वास्तूविशारदांकडून प्रस्ताव मागविले होते. त्यात प्रामुख्याने, रंगमंदिराची सध्याची इमारत पाडून त्याठिकाणी प्रचलित डी.सी. रूलनुसार नाट्यगृहाचा समावेश असणारी नवीन इमारत बांधणे. तसेच सध्याची इमारत कायम ठेवून सध्याच्या नाट्यगृह इमारतीत आवश्यक सुधारणा करणे आणि उर्वरित क्षेत्रावर नव्याने सर्वार्थाने परिपूर्ण अशा रंगमंदिराचा प्रकल्प उभारण्यासाठी डिझाईन सादर करणे. या दोन बाबी होत्या. त्यानुसार, महापालिकेने दिलेल्या मुदतीत 52 जणांनी या विकसनासाठी प्रशासनास पत्र दिले आहे. मात्र, त्यातील प्रत्यक्षात 26 जणांचेच प्रस्ताव प्राप्त झाले होते. हे सर्व प्रस्ताव महापौरांच्या अध्यक्षतेखालील समितीसमोर न ठेवता त्या प्रस्तावांची पहिल्या टप्प्यातील छाननी महापालिका आयुक्तांनी नेमलेल्या 7 सदस्यांच्या समितीने सलग तीन दिवस केली. त्यानंतर 8 प्रस्ताव अंतीम केले असून हे आठ प्रस्ताव महापौरांच्या समिती समोर ठेवले जाणार आहेत.अंतीम आठ प्रस्तावांमधील दोन प्रस्तावांची निवड आता आचारसंहितेनंतरच होणार आहे. त्यामुळे या समितीची बैठक आता लोकसभा निवडणुकीनंतरच होणार आहे.