थकबाकीदार मिळकतधारकांवर होणार जप्तीची कारवाई

0

चारही प्रभागातील 100 बड्या थकबाकीदारांची यादी तयार करण्याचे आयुक्तांचे आदेश

जळगाव: मनपात मार्च एडिंगची धावपळ सुरु झाली आहे. मालमत्ता कराची केवळ 55 टक्के वसुली झाली आहे. त्यामुळे आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी चारही प्रभाग अधिकार्‍यांना बोलावून बैठक घेतली. चारही प्रभाग अधिकार्‍यांनी प्रत्येकी 100 बड्या थकबाकीदारांची यादी तयार करुन वसुलीची मोहीम राबवावी. तसेच थकबाकी न भरणार्‍या मिळकतधारकांवर जप्तीची कारवाई करावी असे आदेश मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी दिले.

आर्थिक वर्षात मालमत्ता कराची 75 कोटींची मागणी आहे. आतापर्यंत केवळ 35 ते 40 लाखांची वसुली झाली आहे. मार्च एडिंगसाठी केवळ 15 दिवस उरले असून मनपा प्रशासनासमोर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे मोठे आव्हान ठाकले आहे. वसुली होत नसल्याने पदाधिकार्‍यांसह नगरसेवकांची देखील ओरड आहे. दरम्यान नुकतेच रुजू झालेले आयुक्त कुलकर्णी यांनी मालमत्ताकर वसुलीचा आढावा घेतला असता त्यांनी वसुलीची आकडेवारी लक्षात घेता असमाधानी असल्याचे सांगितले. त्यामुळे आयुक्तांनी मंगळवारी चारही प्रभाग अधिकार्‍यांची बैठक घेवून मालमत्ता कर वसुलीच्या सूचना दिल्या. वसुलीत हलगर्जीपणा केल्यास कर्मचार्‍यांवरही कारवाई केली जाणार असल्याची त्यांनी तंबी दिली.

मनपासमोर वसुलीचे आव्हान

आर्थिक वर्षात केवळ 55 टक्के वसुली झाली आहे. आता केवळ 15 दिवस उरल्याने मनपा प्रशासनासमोर वसुलीचे मोठे आव्हान ठाकले आहे. डिसेंबरनंतर मालमत्ता कर भरणार्‍यांकडून दरमहा 2 टक्के शास्ती देखील आकारण्यात येत आहे. वसुलीत हलगर्जीपणा करणार्‍या कर्मचार्‍यांवर आयुक्तांनी कारवाईचे संकेत दिल्यामुळे कर्मचार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे.