बाळासाहेबांना अभिवादन करत फडणवीसांनी सेनेला करून दिली हिंदुत्वाची आठवण !

0

मुंबई: आज दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा ७ वा स्मृतीदिन आहे. यानिमित्त त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जातो आहे. स्व.बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतिदिनानिमित्त माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरून अभिवादन केले आहे. फडणवीस यांनी आदरांजली अर्पण करताना बाळासाहेबांचा एक व्हिडीओ ट्विट केला असून, बाळासाहेबांनी सांगितलेल्या गोष्टीची आठवण शिवसेनेला करून दिली आहे. हा शिवसेनेसाठी एक टोलाच आहे.

विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने युतीत निवडणूक लढविली, मात्र निवडणुकीनंतर शिवसेनेने भाजपशी काडीमोड केली. त्यानंतर प्रथमच फडणवीस यांनी शिवसेनेला बाळासाहेबांनी सांगितलेल्या हिंदुत्वाची आठवण करून देण्याचा प्रयत्न केला आहे.

फडणवीस यांनी स्वतः मनोगत व्यक्त केले आहे. “हिंदूह्रदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी स्मृतिदिनी विनम्र अभिवादन करतो. स्वर्गीय बाळासाहेब हे आमच्या सर्वांसाठी स्फुर्तीदायक आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व होतं. महाराष्ट्राचं सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय वैभव म्हणून ज्यांच्याकडं बघता येईल, असे बाळासाहेब ठाकरे होते. बाळासाहेब हे उर्जेचा स्त्रोत होते. छोट्यातील छोट्या माणसाला बाळासाहेबांच्या विचारानं ऊर्जा मिळायची. आपल्या एका वाक्यानं प्रेरित करण्याची क्षमता आणि किमया आदरणीय बाळासाहेबांमध्ये होती,” असं फडणवीस यांनी म्हटले आहे.

या व्हिडीओमध्ये बाळासाहेबांचे भाषण आहे. “जोपर्यंत तुमचा स्वाभिमान जिवंत राहिल, तोपर्यंतच या देशाला काही चांगले दिवस येण्याची शक्यता आहे. नाहीतर रसातळाला चाललंय. नावाला जपा. नाव मोठं करा. एकदा का नाव गेलं की, परत येत नाही. हिंदू धर्माचा भगवा झेंडा सतत आणि सातत्यानं आसमानात फडकत राहिला पाहिजे,” असे आवाहन करणारा बाळासाहेबांचा संवाद यात आहे.