बिबट्याच्या हल्ल्यात एक जखमी

0

निरगुडसर : बिबट्याच्या हल्ल्यात आंबेगाव तालुक्यातील पोंदेवाडीतील खारावस्ती येथील पुरुषोत्तम बबन पोखरकर (वय 33) जखमी झाल्याची घटना घडली आहे.

पोखरकर हे घरी दुचाकी वरून जात असताना रस्त्याच्याकडेला झाडात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात बिबट्याने त्याच्या हाताला चावा घेतला. त्यामुळे त्यांचा गाडीवरील ताबा सुटला आणि ते पडले. ते त्वरित आजूबाजूच्या झुडपात लपून बसले व बिबट्याला चकवत, पळत घरी आल्याने त्यांचा जीव वाचला. पोखरकर यांच्यावर पारगाव येथील खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. सरपंच अनिल वाळुंज यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी पालवे यांना याबाबत माहिती दिली असून या परिसरात लवकरात लवकर पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी त्यांनी केली आहे. या परिसरात अनेकांना बिबट्याने दर्शन दिले असून बिबट्याचा वावर वाढला आहे. त्यामुळे बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांमधून जोर धरत आहे.