बीडीओच्या दालनात महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न

0

जामनेर(प्रतिनिधी):– अतिक्रमणाचा प्रलंबित विषय वेळोवेळी सांगूनही अधिकारी न्याय देत नसल्यामुळे महिलेने पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांच्या दालनात अंगावर रॉकेल ओतण्याचा व जाळून घेण्याचा प्रयत्न केला. कार्यालयातील कर्मचारी व कार्यकर्त्यांनी महिलेच्या हातातील कॅन हिसकावल्याने अनर्थ टळला. दरम्यान या घटनेची परीसरात चर्चा होती.
याबाबत सविस्तर असे की, पळासखेडे बु येथील सुनंदा सोनार या महिलेच्या म्हणण्यानुसार त्यांच्या मालकीच्या जागेच्या अतिक्रमण काढण्याबाबतच्या विषयीचा वाद गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित आहे. हा विषय स्थानिक ग्राम पंचायतीच्या अखत्यारीतील असल्याने सुनंदा सोनार यांनी गेल्या तीन वर्षांत स्थानिक ग्रामपंचायत ते जिल्हा पातळीवर जिल्हाधिकारी यांच्याकडे न्यायासाठी दाद मागितली असता, समर्पक उत्तरे न मिळता निराशाच पदरी पडली. अखेर आज टोकाचे पाऊल उचलत पंचायत समितीचे गट विकास अधिकारी अजय जोशी यांच्या दालनात सुनंदा सोनार यांनी कॅनमधे आणलेेेले रॉकेल अगांवर ओतण्याचा प्रयत्न केला. मात्र कार्यालयीन कर्मचारी महेंद्र मोरे व सामाजिक कार्यकर्ते बाळू चव्हाण यांनी वेळीच महिलेच्या हातातील कॅन हिसकावून घेतल्याने अनर्थ टळला. दरम्यान महिलेला पोलिसांनी ताब्यात घेत कारवाई केली. या आधीही 26 जानेवारीला सदर महिलेने झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी आत्मदहनाचा इशारा दिला होता. परंतु कुठलाही निर्णय न मिळाल्याने सोनार यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. याबाबत गट विकास अधिकारी अजय जोशी यांच्याकडून माहिती घेतली असता या प्रकरणाची चौकशी करून त्या जागेची परत मोजणी करण्याकामी भुमी अभीलेख कार्यालयाशी कायदेशीर पत्र व्यवहार केला आहे. त्यांच्या अहवालात जर या महिलेच्या जागेवर अतिक्रणम झाले असल्याचे निदर्शनास आल्यास अतिक्रमण काढण्याच्या सुचना संबंधितानां देऊ असे त्यांनी सांगितले.