बीसीसीआयच्या करारात मिताली राजचे डिमोशन !

0

नवी दिल्ली: बीसीसीआयने पुरुष क्रिकेट संघाच्यापाठोपाठ महिला क्रिकेटपटूंच्या कराराची घोषणा केली आहे. पुरुष क्रिकेटमध्ये माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला वगळले आहे. त्याचबरोबर महिला क्रिकेटपटूंमध्ये माजी कर्णधार मिताली राजचे डिमोशन करण्यात आले आहे. मिताली राजचे ए ग्रेडमधून बी ग्रेडमध्ये डिमोशन झाले आहे. राधा यादव आणि तानिया भाटीया यांचे प्रमोशन झालेले आहे.

बीसीसीआयनेऑक्टोबर 2019 ते सप्टेंबर 2020 साठीचा हा करार जाहीर केला. ए, बी आणि सी अशा ग्रेडमध्ये खेळाडूंची विभागणी करण्यात आली आहे. त्यानुसार ए गटातील खेळाडूंना 50 लाख, बी गटातील खेळाडूंना 30 लाख आणि सी गटातील खेळाडूंना 10 लाख रुपये मिळणार आहेत. ए गटात केवळ हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना आणि पूनम यादव या तिघींचाच समावेश आहे. गतवर्षी याच गटात असलेल्या मितालीला यंदा बी ग्रेडमध्ये स्थान दिले आहे.

मितालीसह बी ग्रेडमध्ये झुलन गोस्वामी, एकता बिस्त, राधा यादव, शिखा पांडे, दीप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रीगेज आणि तानिया भाटीया यांचा समावेश आहे. सी गटात वेदा कृष्णमुर्ती, पुनम राऊत, अनुजा पाटील, मानसी जोशी, डी हेमलथा, अरुंधती रेड्डी, राजेश्वरी गायकवाड, पूजा वस्त्राकर, हर्लीन देओल, प्रिया पुनिया आणि शेफाली वर्मा यांचा समावेश आहे. यापैकी हर्लीन, प्रिया आणि शेफाली यांना प्रथमच करार देण्यात आला आहे.