बेपत्ता विद्यार्थिनीचा मृतदेह आसोदा रेल्वेगेटजवळ आढळला

0

कांचनगरातील घरुन 15 फेब्रुवारीपासून होती बेपत्ता ः घातपाताचा संशय

जळगाव : शहरातील कांचन नगरातील रहिवासी तसेच नंदिबाई विद्यालयातील पंधरावर्षीय विद्यार्थीनी शनिवार (ता.15) पासुन बेपत्ता होती. सोमवारी सकाळी आसोदा रेल्वेगेटवरील गेटमनला रेल्वेरुळापासून 9 मिटर लांब झुडपात अनोळखी तरुणीचा मृतदेह आढळून आला. शनिपेठ पोलिसांना संपर्क केल्यावर तत्काळ पोलिसांनी धाव घेत मृतदेह जिल्हारुग्णालयात दाखल केल्यावर मृतदेहाची ओळख पटली. कोमल हिरामण सोनवणे (वय-15) असे, मयत मुलीचे नाव असून शनिपेठ पेलिसांत अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. नाकातोंडातून रक्त निघालेले असून मृत्यु नंतर मृतदेह रेल्वेरुळा शेजारी आणुण टाकल्याचा पोलिसांना संशय असून त्यादृष्टीने पोलीस तपास करत आहेत.

रेल्वे गेटमनला दिसला मृतदेह

कोमल हिरामण सोनवणे (वय-15) हि नंदिनीबाई विद्यालयात इयत्ता दहावीचे शिक्षण घेत होते. कोमल शनिवार (ता.15) पासुन घरातून बेपत्ता झाली होती, कुटूंबीयांनी दिवसभर शोध घेवुन रात्री शनिपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यावरुन अज्ञात तरुणाच्या विरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज सकाळी पावणे नऊवाजेच्या सुमारास आसोदा रेल्वेगेटवरील गेटमन सनकलाल दुबे यांना रुळापासून बर्‍याच लांब झुडपात मृतदेह पडल्याचे आढळून आले. दुबे यांनी स्टेशन मास्टर आणि शनिपेठ पोलिसांना कळवल्यावरुन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. असोदा रेल्वेगेट जवळ मृतदेह आढल्याचे वृत्त कळताच कांचनगर, जैनाबादसहीत परिसरातील रहिवाश्यांनीही धाव घेतली. मृतदेह उचलून जिल्हा रुग्णालयात आणण्यात आल्यावर परिसरातील रहिवाश्यांसह मुलीचे वडील हिरामण सोनवणे यांनी मृतदेह पाहताच हंबरडा फोडला. मुलीची ओळख पटल्यावर पंचनामा करुन शवविच्छेदनास सुरवात करण्यात आली.

बेदम मारहाणीमुळे झाला मुलीचा मृत्यू

कोमल हिचा शवविच्छेदन अहवालानुसार बेदम मारहाणीत पोटात रक्तश्राव झाल्याने मृत्यू झाल्याचे निदान झाले आहे. त्यामुळे तिला मारहाण करण्यात आली. मारहाणीनंतर तिला असोदा रेल्वेगेटजवळ असलेल्या झुडपात फेकून दिल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यादृष्टीने पोलीस उपअधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनात शनिपेठ पोलीस तपास करीत आहेत.

मृतदेह रेल्वेरुळाशेजारी आणून टाकल्याचा संशय

मयत कोमल सोनवणे हिचा मृतदेह रेल्वेरुळापासून तब्बल 9 मिटर लांब झुडपात खड्ड्याजवळ सापडला. रेल्वेचा धक्का लागून नऊ मिटरपर्यंत मृतदेह फेकला जाईल या बाबत पोलिसांना शंका आहे. मयत मुलीचा उजवा हात व दोन्ही पाय फ्रॅक्चर असून एका पायाचे हाड बाहेर निघलेल्या अवस्थेत होते. नाकातोंडातून रक्त निघालेले असून मृत्यु नंतर मृतदेह रेल्वेरुळा शेजारी आणुण टाकला की, कसे या बाबत निरीक्षक विठ्ठल ससे, सहाय्यक फौजदार सलिम पिंजारी तपास करीत आहेत. हिरामण सोनवणे ऑटोरिक्षा चालवून कुटूंबीयांचा उदनिर्वाह करतात, मयत मुलीच्या कुटूंबात आई मंगलाबाई, भाऊ प्रिन्स, यशराज, लहान बहिण सोनी असा परिवार आहे. शनिवार पासून कोमल घरातून बेपत्ता झाली होती. आज तिचा मृतदेह आढळल्याने कुटूंबयांनी प्रचंड
आक्रोश केला.